जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना
जगताचा हा पोशिंदा त्याला नाही कुणी वाली
नाही कणव मनात पार पार दैना झाली
ऊन वारा नि पाऊस बारा महिने झेलतो
काटे कुटे धशातून अनवाणी तो चालतो….
पाय भेगाळती सदा नाही बघाया सवड
पण पोळ्याला लावतो सर्जा बिर्जाला बेगड
लाड पुरवतो सारे घरादाराला पोसतो
सदा कष्टाचीच फुले बांधाबांधाने वेचतो..
घाम गाळून गाळून पिकवतो शाळू मोती
मनी सदा न् कदा ती अवकाळीचीच भीती
हाता तोंडातला घास घेतो काढून पाऊस
कधी बघता बघता जळूनच जातो ऊस….
नाही कष्टाला हो साथ जणू नशिब फुटके
किती शिवावा संसार किती घालावे हो टाके
नाही जाणीव कुणाला नाही कष्टाची कदर
अन्नदात्या विषयी हो नाही मनात आदर …
लुटतात व्यापारी नि पुरताच नागवितो
होतो हताश नि मग फास जवळ करतो
तरी सुटेना ग्रहण, मग येतात पुढारी
फोटो निघतात आणि जाती सुसाट मोटारी …
संसाराचा पंचनामा सारा गाव होतो गोळा
त्याच्या मरणाचा मग होतो साजरा सोहळा
दहा दिवसात मग पांगा पांग होते सारी
हात कपाळा लावित बसे रडत बिचारी …..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २३ डिसेंबर २०२१
वेळ : सकाळी ११ : २३