जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
स्वप्नी आला यक्ष म्हणे मज प्रश्न तुला वदतो माझे
उत्तर जर कां देशील याचे जन्म मरण चुकवींन तुझे
स्मरण गुरूंचे मनात केले आणि म्हणालो सांग आता
कठीण असुदे कोडे कितीही उत्तर घे जाता जाता
असा कोणता वृक्ष सांग ज्या वेगवेगळी फळे कसे?
असा कुठे या सागर जगी सरितेस भेटण्या धावतसे?
रोग असे शरीरात अंतरी औषध डोळ्यातून कसे?
मुळे आकाशी वृक्ष पसरला जगता मध्ये कुठे दिसें?
भेट क्षणाची घेण्यासाठी कुणी मैल हजारो तुडवीतसे
सांगशील कां अवघड तरी उत्तर साऱ्यांचे एक असे
हात गुरूंचा असे मस्तकी हंसलो मी मग सांगितले
उत्तर यांचे विठू माऊली जे पंढरी नगरी अवतरले
वृक्ष एक तो भीमातीरी बघ उभा ठाकला विटेवरी
नामा, ज्ञाना, चोखा, तुकया फळ संतांची कितीतरी
सागर भक्तांचा धावे हा जणू विठ्ठल सरिता प्रेमाची
भवरोग शरीरी औषधास पण गरज दर्शना डोळ्यांची
देव आकाशी वृक्ष कृपेचा जगी पसरला पहा जरा
मैल हजारो आषाढी कार्तिकी वारकरी तुडवितो खरा
मज उत्तर एकच या प्रश्नांचे सुचले जे गुरु भक्तीने
अरविंद सांगता यक्षाला हे तोही धावला लगबगीने
अरविंद
18/7/21