You are currently viewing इचलकरंजीत संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

इचलकरंजीत संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी शहरात संत गाडगे महाराज सेवा मंडळाच्या वतीने समाजमंदिर याठिकाणी विविध कार्यक्रमांनी संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती संजय केंगार ,सौ.मौसमी आवाडे ,लक्ष्मण परीट यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी शहरात समस्त परीट समाजाची संघटना म्हणून संत गाडगे महाराज सेवा मंडळाने मोठी ओळख निर्माण केली आहे.या मंडळाच्या माध्यमातून परीट समाज बांधवांना संघटीत करुन त्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.स्वच्छतेचे उपक्रम राबविले जातात. याशिवाय नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना जीवनोपयोगी साहित्य वाटप ,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ,प्रबोधनात्मक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करुन वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. यंदाच्या वर्षी संत गाडगे महाराज सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज यांची 65 बी पुण्यतिथी सोहळा विविध उपक्रमांनी पार पडला. प्रारंभी सकाळी सहकार नगर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संत गाडगे महाराज पालखीचे पूजन करुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पालखीचा मान सौ.मंगल परीट ,सौ.संगिता शिंदे यांना देण्यात आला होता. यानंतर समाजमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज प्रतिमा पूजन ,दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रथमतःसेक्रेटरी गणपती परीट यांनी प्रस्तावना मांडली त्यामध्ये संत गाडगेबाबा चे विचार अगदी तळमळीने सांगितले.यावेळी चिमुकल्यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.तर सुहास परीट यांनी व्यसनमुक्ती या विषयावर संवाद साधून समाजबांधवांचे चांगले प्रबोधन केले.

यानंतर परीट समाजातील पतसंस्थेचे चेअरमन गोविंद कांबळे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना संत गाडगे महाराज यांचे निरपेक्ष समाजसेवेचे कार्य हे जगाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा हा आपल्या आचार ,विचारातून जपूया ,असे आवाहन केले.यावेळी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झालेल्या श्रध्दा जाधव ,श्रावणी जाधव ,ऋषीकेश शिंदे ,सुयोग परीट या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.मंडळाचे जाँईंट सेक्रेटरी गणपती परीट यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

दरम्यान, सौ.मौसमी आवाडे यांनी या सोहळ्यास धावती सदिच्छा भेट देवून समस्त परीट समाजाच्या महिलांच्या एकजुटीचे कौतुक केले. तसेच महिला व युवतींना स्वतःचे वेगळेपण सिध्द करुन समाज विकासात योगदान द्यावे, असे मौलिक मार्गदर्शन केले.

या सोहळ्यास संत गाडगे महाराज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती परीट,विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण परीट ,उपाध्यक्ष शेखर शिंदे , सेक्रेटरी सर्जेराव परीट ,खजिनदार सुनील परीट ,सल्लागार राजकुमार परीट यांच्यासह समस्त परीट समाजातील महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा