सिंधुदुर्ग
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत. सध्या जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपाना उधाण आले असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडी चे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीयउद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.तर आ. नितेश राणे यानीही संतोष परब हल्ला प्रकरणात मला नाहक गोवण्याचा डाव सुरू असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तर शिवसेना आम.वैभव नाईक यांनी संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे व गोट्या सावंत याना अटक न केल्यास एसपी कार्यालयावर शिवसेना मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल हे प्रतिवर्षी डिसेंबर अखेर होणाऱ्या डीवायएसपी, पोलीस स्टेशन च्या वार्षिक तपासणी साठी कणकवलीत दाखल झाले आहेत. आज सकाळी लवकर डीवायएसपी कार्यालयात दाखल होत त्यांनी माहिती घेत वार्षिक तपासणी सुरू केली आहे. त्यानंतर ते जिल्ह्यातील पोलीस स्टेशन ला भेट देणार असल्याची माहिती समजली आहे.