You are currently viewing मला ही आलेला धमकीचा फोन” : केसरकरांचा गौप्यस्फोट

मला ही आलेला धमकीचा फोन” : केसरकरांचा गौप्यस्फोट

१०० अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने काढलेलं सुदर्शन चक्र

विशेष संपादकीय…..

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांतच कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांवर झालेला चाकू हल्ला यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुका आल्या की अशांतता पसरवून मतदारांमध्ये भीतीदायक वातावरण निर्मिती करणे हा जुना फंडा आजमावण्याची सुरुवात झाली आहे. श्रीधर नाईक हत्येपासून जिल्ह्यात राजकीय हत्यांना सुरुवात झाली, तत्पूर्वी जिल्ह्यातील निवडणुका ह्या उच्चपातळीवरील सभ्य राजकारणातून लढविल्या जात होत्या. जे काही आरोप प्रत्यारोप व्हायचे ते तत्व सांभाळून. परंतु त्यानंतर सुरू झालेला राजकीय संघर्ष अजूनही शमण्याचे नाव घेत नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सतीश सावंत आदींना सोबत घेत पत्रकार परिषद घेऊन आपल्यालाही समर्थकांकडून धमकीचा फोन आलेला असा गौप्यस्फोट केला. सत्तेतील संघर्षासाठी धमक्या देणे, दहशत निर्माण करणे हे सर्व दीपक केसरकर यांनी गेली कित्येकवर्षं अनुभवले आणि त्याला पुरुनही उरले आहेत. त्यामुळे राजकीय दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात पुन्हा एकदा दंड थोपटण्याची वेळ आली असल्याचेच केसरकरांच्या बोलण्यातून दिसून आले. कोणाचेही नाव न घेता दीपक केसरकर यांनी लोकांना निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
सावंतवाडीतील जनतेने आपल्याला प्रेमाने निवडून दिले त्यामुळे आपल्या राजकीय वारसदार देखील तेच ठरवतील असे सांगत सावंतवाडी नगरपालिकेच्या भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आपण नगरपालिकेत “स्वच्छ चारित्र्याचा नगराध्यक्ष” देणार असे सांगून दीपक केसरकर यांनी नक्की कोणावर निशाणा साधला? असा प्रश्न प्रत्येक सावंतवाडीवासियांच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. केसरकरांच्या या विधानावरून ते सावंतवाडीतील जनतेला नक्की कोणाचे चारित्र्य तपासून घ्यायला सांगत आहेत? हे मात्र अधोरेखित केलेलं परंतु सावंतवाडीकरांना उद्देशून बोललेलं (कंसातील) बोलणं आहे. दीपक केसरकर हे विरोधकांच्या मागे लागतात तेव्हा पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतात. अशाचप्रकारे दीपक केसरकर यांनी सात आठ वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्यावर राजकीय दहशतवादाचे आरोप करत रान उठवले आणि लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राणे पिता पुत्रांना पराभवाचे तोंड दाखवले. नारायण राणेंच्या विरोधात प्रथमच कोणीतरी खुलेआम मैदानात उतरलं आणि त्यांना बॅकफूटवर धाडलं, त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात दीपक केसरकर हे नाव सर्वांमुखी झालं, केसरकरांची राजकीय ओळख निर्माण झाली, राजकीय वजन देखील वाढलं. त्यामुळे केसरकरांनी मांडलेला स्वच्छ चारित्र्याचा मुद्दा विशेष आहे आणि सावंतवाडीच्या सुसंस्कृत जनतेला नक्कीच यावर विचार करावा लागणार. जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवर बोलताना केसरकरांनी श्रीकृष्णाचे उदाहरण देताना “१०० अपराध झाल्यावरच श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र काढले होते” याची आठवण करून देताना जिल्हावासीय देखील गुन्हे वाढले की कधीतरी एकदा सुदर्शन चक्र काढतील असे सांगितले.
दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत विकासाची गंगा आली, त्यानंतर विकास मंदावला होता, परंतु सावंतवाडीत राजकारण हे स्वच्छ होतं, चांगल्या विचारसरणीचे नेते विरोधी असूनही सुसंस्कृतपणा राखून होते. आजकालचे राजकारण हे संधीसाधू झालं आहे, नवा कोणीतरी राजकारणात प्रवेश करतो तो केवळ आपल्या गैरधंद्याना राजकीय आश्रय मिळावा म्हणूनच. मतदारांनी आपले प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती काय करते, कोणता व्यवसाय करते? तिचे चारित्र्य काय? भविष्यात आपली मुले राजकारणातील त्या राजकीय व्यक्तीचा आदर्श घेऊन आपल्या समोर आली तर? या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे. तरच शहराचा सर्वसमावेशक विकास होईल, अन्यथा गैरधंदे, गैरकारभार तेवढेच मार्गी लागतील.
संवाद मिडीयाने काही दिवसांपूर्वी आपल्या संपादकीय मधून सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर बाजार भरवून फुटपाथ ला झोपडपट्टी केल्याचे म्हणत तलावाच्या काठावरील रेखीव पथदीप ताडपत्र्यांच्या दोऱ्या बांधल्याने अखेरच्या घटका मोजत असल्याचे म्हटले होते, आम.दीपक केसरकर यांनी हाच मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आम.दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत कनेडी कणकवली दाणोली बावळाट बांदा या महामार्गासाठी पैसेही मंजूर झाल्याचे सांगत सावंतवाडीला पर्यटनदृष्ट्या महत्व मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले असून हा सह्याद्री महामार्ग गोव्याला जोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा