ख्रिस्ती धर्मियांचा सण नाताळच्या निमित्ताने कुरुंदवाड येथील ज्येष्ठ लेखक प्रा.श्री.दिलीप सुतार यांनी लिहिलेला अप्रतिम लेख
जागतिक स्तरावर सर्वाधिक अनुयायी असलेला ख्रिस्ती…किंवा ख्रिश्चन धर्म…याच धर्माचे संस्थापक येशू किंवा ईसा मसीह यांचा जन्मदिन दि.25 डिसेंबर रोजी प्रतिवर्षी ‘नाताळ’ किंवा ‘मेरी ख्रिसमस’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
व्यवसायाने सुताराचा पुत्र असलेल्या पण मानवमुक्तीसाठी जन्मलेले ,स्वत:ला प्रकाशाचा पुत्र म्हणवून घेणारे प्रभू येशू एक थोर मानवतावादी व्यक्ती होते.त्यानी संपूर्ण जगाला प्रेमाचा,मानवतेचा संदेश दिला.समाजाला सद्भावनेची दया क्षमा शांती व करूणेची शिकवण दिली. म्हणूनच त्यांच्या जन्मापासूनच इ.स पूर्व व नंतर अशी कालगणना सुरू करणेत आली.
नाताळचा सण साजरा करताना जगभरातील ख्रिस्ती बांधव खूप मोठी तयारी करतात…घरांची स्वच्छता…रंगरंगोटी…सजावट…विद्य्युत रोषणाई…विविध प्रकारचे केक…मिठाई…शुभेच्छा पत्रे,भेटवस्तूंची खरेदी अशी जय्यत तयारी हा तर पारंपारिक उत्साहाचा भाग सर्व ख्रिस्ती कुटुंबात हमखास पहायला मिळतोच.आपल्या कुवतीनुसार आपल्या लाडक्या प्रभू येशूचा जन्मदिवस हा जास्ती जास्त उत्तम प्रकारे व अविस्मरणीय करण्याकडे प्रत्येकाचा कल दिसतो.
ख्रिस्ती परंपरेनुसार नाताळचा सण साजरा करताना प्रत्येक घरात ख्रिसमस ट्री पहायला मिळतो.
ख्रिसमस ट्री म्हणजे फर व्रुक्ष…त्याचा आकार चर्चच्या शिखरासारखा असतो व तो सदाहरित असल्याने सुफलतेचे..सम्रुद्धीचे प्रतीक म्हणून त्याची सजावट व पूजा केली जाते.
नाताळ उत्सवाचा दुसरा अविभाज्य भाग म्हणजे…*ख्रिसमस कँरोल्स*
अर्थात खास नाताळसाठी रचलेली भक्तीगीते अथवा प्रार्थना…!ही प्रथा 13व्या शतकात प्रथम इटली येथे सुरू झाल्याचे सांगितले जाते.सेंट फ्रान्सिस यांनी बाल येशूच्या सुय़श स्तुतीपर कँरोल्स रचली …तोच या प्रथेचा जनक मानला जातो.ख्रिसमस ईव्ह किंवा नाताळच्या पूर्वसंध्ये पासूनच सांयंप्रार्थनांना सुरूवात होते.जगातील काही देशात नाताळ पूर्वी एक आठवडा लहान मुले घरोघरी जाऊन प्रभूयेशूचे गुणगाण करणारी कँरोल्स गात असताना दिसतात.
जगातील सर्वच जाती धर्मातील लोक विविध सण उत्सव प्रसंगी आपापल्या धार्मिक स्थळांवर जाऊन अथवा घरी किंवा जिथे कुठे शक्य असेल योग्य वाटेल अशा ठिकाणी आपल्या नैमित्तिक पूजा-अर्चा उपासना म्हणून अथवा मानसिक भावनिक गरज म्हणून प्रार्थना करत असतात.
मानवाने आपल्या इष्ट देवतेला अथवा कुलदेवतेला किंवा अन्य निसर्ग शक्तीना श्रद्धापूर्वक केलेले नि:शब्द अथवा शाब्दिक स्तवन,संकटमोचक आत्मनिवेदन, मदतीचे विनम्रआवाहन ,उपकार अथवा क्रुतद्न्यता पूर्वक केलेले…अथवा पश्चाताप कबूली वा आर्तपणे केलेली याचना म्हणजे प्रार्थना…!
अशा प्रार्थनेची नेमकी सुरूवात कधी कोणी केली हे सांगणे, शोधणे कठिण अाहे…पण आदिम व प्रगत अशा सर्व काळात समाजात प्रार्थना आढळते.
प्र+अर्थ…म्हणजे प्रकर्षाने विनम्र भावे याचना करणे…आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला शरण जात व्यक्तीगत अथवा सामूहिक कल्याणाची सुख शांतीची याचना…म्हणजे प्रार्थना होय…!
जगातील सर्व जाती धर्मात भाषेत छोट्या मोठ्या सुंदर, गद्य, पद्य स्वरूपात, काही उच्चारायला कठिण अशा मंत्र स्वरूपातील तर काही अतिशय साध्या सोप्या ,गेय, अलंकारिक , प्राचीन आधुनिक प्रार्थना आढळतात…!
काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा केला जातो… हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते.
काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
नाताळ हा शब्द *नातूस* म्हणजे *जन्म* या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत *ख्रिसमस* म्हणतात.
ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाते. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.
दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जात असे. मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाते. हे इस्राईल देशातील एक छोटंसं गावं आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा (प्रभू येशू) जन्म झाला. ह्या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो. नंतर चर्चमध्ये सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र जमत त्यावेळी तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
नाताळ आणि सांताक्लाँज-
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी या सणाची एक पारंपरिक धारणा आहे .हा सांताक्लाँज म्हणजे कोण होता?
तर तो आशिया मायनर मधील एक बिशप होता. त्याचे लहानमुलांवर खूप प्रेम होते… तो गरीब गरजू मुलाना भेटवस्तू देऊन त्यांचे रंजन करत असे.इंग्लंड मधे त्याला ख्रिसमस फादर असे म्हंटले जाते.
नाताळच्या निमित्ताने ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात.
प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला म्हणून कॅथोलिक पंथातील लोक ख्रिस्त जन्माची आठवण म्हणून प्रतीकात्मक गोशाळा किंवा गायीचा गोठा तयार करतात व तो सजवितात.
प्रभू येशूचा जन्म दिन म्हणजे ख्रिसमस हा सण मानवतेचा संदेश देणारा वैश्विक सण आहे…जेव्हा येशूला प्रचंड यातना देऊन सूळावर चढवले जात होते …तेव्हा तो परमेश्वराला, आपल्या स्वर्गीय पित्याला म्हणाला होता…’मला सूळावर चढविणारे लोक काय करत आहेत ते त्याना माहित नाही…कळत नाही…त्यांना माफ कर…!’
प्रभू येशू असो…गाौतम बुद्ध असो..संत ज्ञानेश्वर माऊली असोत जगद गुरू तुकाराम , गुरू नानक,महात्मा गांधी ,मदर तेरेसा किंवा जगाच्या विविध भागात विविध प्रातांत होऊन गेलेले संत अथवा साने गुरूजी, या सर्वांच्या ओठी, ह्रदयी सदैव एकच संदेश आहे…*खरा तो एकची धर्म…जगाला प्रेम अर्पावे…!*
*सर्वांचा सूर एकच…मानवता हाच खरा धर्म…मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा…!*
हाच नाताळ किंवा मेरी ख्रिसमस सारखा जागतिक महोत्सव साजरा करण्या पाठीमागचा खरा उद्देश…हेतू असायला हवा…आजच्या कोरोना पिडित जागतिक महामारीच्या कालात…आपण माणूसकीला पारखे होत आहोत…दैनंदिन धकाधकीचीे जीवन शैली ,प्रत्येक क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा…स्वत:च्या जात धर्माबद्दलचा अनाठाई अतिरेकी गर्व … स्वार्थी अहंकारी द्वेषमूलक सत्ता संघर्ष…वाढत्या नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती…यातून आपण माणूसकीला पारखे होत आहोत…सहज,साधी राहणी …शांत ,तणावरहित निरामय आरोग्यसंपन्न जीवनशैली हीच खरी संपूर्ण जगाची नितांत गरज आहे…याचेच भान आपण हरवत चाललोय… वैयक्तीक भौतिक सुख सुविधांच्या पलिकडे सुद्धा एक खूप सुंदर जग आहे… ते आपल्याला आणखी सुंदर करता येऊ शकते,म्हणूनच येतो नाताळ सारखा सण,त्याच्या सोबत सांताक्लाँज,जगतपित्याची
धर्मांची खरी शिकवण अधोरेखित करण्यासाठी…!आपल्या सर्वांच्या डोळ्यांत मानवतेचे अंजन घालण्यासाठी…मानवी जीवनाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी…!माणसातलं माणूसपण शोधण्यासाठी…व ते व्रुद्धिंगत करण्यासाठी…!!!
प्रा. दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं 9552916501