*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख
मला तर ह्या प्रकरणी हसावे की रडावे तेच कळत नाही ..
आपण सदा सर्वदा चिंता करतो ती पैशांची … ? आणि ते
चूक आहे असे ही नाही .. आपले जीवनच पैशांभोवती फिरते
त्याला काय करणार ?
माझ्या मते .. फी कमी करा असे म्हणतांनाच ..ह्या शाळा
ॲानलाईन झाल्यापासून ग्रामीण व शहरी भागात या परिस्थितीचा मुलांच्या अभ्यासावर काय परिणाम झाला , काय नफा नुकसान झाले , त्यावर काय उपाय करता येईल
ह्या गोष्टींची जास्त चर्चा व्हावी हे अपेक्षित आहे.
पैसा महत्वाचा नाही असे कोणी ही म्हणणार नाही पण
पैशांइतकी आस्था आपल्याला कशातच नाही असे ही चित्र
वारंवार दिसते ते चांगले नाही.
खेड्यापाड्यातून गरीबांकडे मोबाईल नाहीत व आहेत तिथे
रेंज नाही म्हणून मुलांच्या शिक्षणाची वाट लागली आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. ह्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्राचे,
पर्यायाने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पायाच कच्चा
राहिला तर भक्कम इमारत कशी उभी राहणार हो …?
उच्च शिक्षणाची ही भयंकर हानी झाली आहे. याची चिंता
आपण करायला हवी . मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात तर
विचारूच नका…! डिग्री मिळण्यापासून तर नोकरी मिळण्या
पर्यंत प्रश्नच प्रश्न आहेत …!
आता .. शाळा व मॅनेजमेंट यांना कळत नाही असे वाटते
का तुम्हाला ..? पण आम्ही डोळ्यावर कातडं ओढण्यात
तरबेज .. एरव्ही ही आम्ही शिक्षण क्षेत्राचे कुरण बनवले
आहेच मग आता तरी आम्ही संधी कशी सोडणार ..?
अहो , तुम्ही शाळा भरवतच नाही .. मग तुमचा बराचसा
खर्च (१००/. नाही) कमी झाला असेल तर तुम्ही स्वत: होऊनच
फी कमी केली पाहिजे …? हे त्यांना कळत नाही असे कसे
शक्य आहे ..? पण नेहमीच आम्हाला घेणेच कळते . देणे
नाही .. किंबहुना ती आमची प्रवृत्ती आहे नि आपण सारे एकाच
माळेचे मणी आहोत हे लक्षात ठेवा . त्यांच्या जागी आपणही
हेच केले असते हे नाकारण्याची हिंमत आहे तुमची .. ?
नाही ना .. मग त्यांना बोलून काय फायदा ? अहो, आपली
मेंट्यालिटीच ती आहे .. ओरबाडणे …”दुसऱ्याला जाब विचारतांना स्वत: स्वच्छ असावे लागते ..”हे तरी किती
लोकांना माहित आहे …?
म्हणून फी परत मागू नका असे मी म्हणत नाही पण ते करतांना
आपण कुठे आहोत हे ही तपासायची गरज आहे .. नैतिकता
अशी एकाएकी आकाशातून खाली पडत नाही तर ..
ती तुमच्या नसानसात मुरलेली असावी लागते आणि ह्या
बाबतीत आपल्याकडे सर्वत्र आनंदी आनंदच आहे …
हे कठोर सत्य आहे … म्हणून इतरांवर दगड मारण्या पुर्वी तो
मारण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का ते तपासून
पहा … एवढेच मला सांगायचे आहे …
फी परत मागू नये ह्या मताची मी नाही किंबहुना न मागताच
त्यांनी ती कमी करायला हवी असे मला वाटते..
“धन्यवाद ….”
आणि हो … ही फक्त माझी मते आहेत बरं का ?
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)