मुदत संपत असलेल्या मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीत प्रशासक नियुक्त
संपूर्ण जगभर पसरलेल्या कोविड-१९ चे संक्रमण राज्यात पसरल्याने राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेळेत घेणे शक्य नसल्याने शासन आदेश क्र.एमसीओ-२०२०/प्र. क्र.७१/नावि १४ ने सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.०६ नुसार संबंधित नागरी स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र क्र.रानिआ/न.पा.२०२१/प्र. क्र.९/का.६/२९-११-२०२१ ने कळविले आहे. मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेची मुदत २१/१२/२०२१ तर सावंतवाडी न.पा. मुदत २२/१२/२०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे या तिन्ही नगरपरिषदांवर प्रशासक बसणार असून उद्यापासून सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांच्या हाती जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार प्रशासक हाकणार असल्याने उद्यापासून नगराध्यक्षांची केबिन खालीच राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्षांचा कारभार उद्यापासून बंद होणार. शहरांतील विकासात्मक कामे सुरू होण्याच्याच दिवसात नगरपालिका प्रशासनावर प्रशासक नियुक्ती झाल्याने शहरातील विकास कामांवर काही प्रमाणात नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा अतुलनीय विकास झालेला आहे. नगराध्यक्ष गिरप यांनी सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेत आजी माजी पालकमंत्री आदींच्या सहकार्याने उत्तमरीत्या शहराचा विकास साधला आहे. मालवण नगरपालिका देखील पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गावर आली असून विकसित नगरपालिका म्हणून जिल्ह्यात अग्रक्रमाने नाव घेतले जायचे ती सावंतवाडी नगरपालिका मात्र विकासाच्या बाबतीत बरीच मागे पडल्याचे दिसून येत आहे. काही आश्वासक प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न आहेत परंतु सुरू न झाल्याने विकास खुंटल्याचेच चित्र आहे, आणि प्रशासक नियुक्तीनंतर विकासाला खीळ बसण्याचीच शक्यता आहे.
सावंतवाडीत विकास एकतर कागदावर किंवा बोलून दिसतो परंतु वेंगुर्ला नगरपालिकेतील विकास नजरेत भरतो आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचा नगराध्यक्ष गिरप यांनी केलेला विकास आणि शहरात झालेले जनतेच्या हिताचे प्रकल्प यामुळेच वेंगुर्ला नगराध्यक्षांना सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून पुरस्कार देण्यात आला. सावंतवाडीचा खुंटलेला विकास भविष्यात अशाचप्रकारे मार्गी लागावा अशी सावंतवाडी वासीयांची देखील अपेक्षा असल्याचे शहरवासीयांच्या बोलण्यातून जाणवत आहे. त्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुका लवकरच होऊन सावंतवाडीचा कारभार कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर हातात जाणे अत्यंत आवश्यक आहे.