बघता बघता आई-बाप…
म्हातारे होतात.
बाळ जन्मा येताच..
आनंदाश्रू गाळतात.
तान्हुल्याला तळहातावरच्या,
फोडासारखे जपतात.
रांगताना.. बागडताना,
लहान होऊन जातात.
तरीही… बघता बघता
आई-बाप…म्हातारे होतात.
शाळेत जाता बाळासोबत,
विध्यार्थीही बनतात.
अभ्यास शिकवता बाळाला,
शिक्षक होऊन जातात.
मांडीवर घेऊन प्रेमाने,
चार घास भरवतात.
आजारी असता बाळ तर,
रात्र रात्र जागतात.
तरीही…बघता बघता,
आई-बाप…म्हातारे होतात.
कॉलेजमध्ये बाळाला,
नवे पंख फुटतात.
आईबापाच्या जीवावर,
सगळी मौज करतात.
मिसरूड फुटता ओठांवर,
ते बालपण विसरतात.
सुसंस्कृत करतात आईबाप,
ते सुशिक्षित बनून जातात.
तरीही…बघता बघता,
आई-बाप…म्हातारे होतात.
नोकरी, धंदा, उद्योग हीच,
कमाईची साधनं बनतात.
गाडी, बंगला, पैसा हेच,
सर्वस्व समजू लागतात.
कष्ट उपसून घाम गाळून,
आईबाप ज्यांना वाढवतात.
पद, पैसा, प्रतिष्ठेसमोर,
आईबाप थिजे वाटू लागतात.
तरीही…बघता बघता,
आई-बाप म्हातारे होतात.
आम्ही दोघं आमचा एक,
हेच कुटुंब मानतात.
आजी-आजोबांच्या प्रेमाला,
नातवंड पारखी होतात.
कल्पनेतल्या सुखासाठी,
आई-बाप अडचण भासतात.
वृद्धाश्रमंच त्यांच्यासाठी,
योग्य जागा ते समजतात.
कारण…
बघता बघता…
आई-बाप…म्हातारे होतात…!!
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६