जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा समाजातील विचारांच्या प्रदूषणावर लिहिलेला अप्रतिम लेख
प्रदूषण म्हटलं की सर्वात पहिलं आठवतं ते हवा प्रदूषण… पाणी प्रदूषण… हो आठवणारच, कारण जगातील जास्तीतजास्त रोग रोग याच प्रदूषणामुळे मानवांमध्ये, पशु-पक्षांमध्ये जडू लागले आहेत.
अनेक गंभीर आजारांनी तर मानवांना मेटाकुटीस आणले आहे, साथ रोगांचा फैलाव आणि त्यातून उत्पन्न होणारे गंभीर आजार आणि मृत्यू हे हवा आणि पाणी प्रदूषणामुळे होतात….हवा आणि पाणी प्रदूषणामुळे निसर्गाची हानी तर होतेच..परंतु मानवाच्या जीवनाची साखळीच तुटून पडते..
परंतु मला इथे या दोन प्रदूषणांपेक्षा एक वेगळं प्रदूषण जे आज मानव जातीत अतिशय जोमाने पसरते त्यावर बोलायचे आहे….ते म्हणजे मानव जातीत माणसांच्या विचारांना होणारे विचारांचे प्रदूषण….विचार प्रदूषण…
हो, आज एकवेळ प्राण्यांचे, पक्षांचे विचार, बुद्धिमत्ता अतिशय प्रगत झालेली दिसून येते, एकोप्याने राहणे असो वा निसर्गाच्या लहरीपणामुळे येणाऱ्या संकटांना तोंड देताना हवामान बदलानुसार वागणे असो… प्रत्येक वेळी पशु पक्षी सुधारणा करताना दिसून येतात….आकाशात घिरट्या घालणारे पक्षी थव्यानेच उडतात, थव्यानेच एकोपा जपत बसतात, पावसाची चाहूल लागतात पक्षी पावसाचे भविष्य वर्तवित गरजेनुसार उंचीवर आपले घरटे बांधतात, तर काही पक्षी येणाऱ्या थंडीच्या आगमनाने सावध होत चोचीतून माती आणून आपल्या लाळेच्या सहाय्याने सर्वांगसुंदर रचना असलेली मातीची उबदार घरं लिपतात…त्यांना कुठे लागतो आर्किटेक्ट…. अन इंजियनिर….?? आपल्या अक्कल हुशारीने गरजेनुसार विचारांनी प्रेरित होऊन घरकुल साकारतात….वेळ निघून गेल्यावर दुसरीकडे स्थलांतरित होतात…पण मग मानवाचं काय??
जसजसे जग प्रगतीकडे जात आहे, वेगवेगळ्या सुधारणा होत आहेत…२जी, ३जी, ४जी कडून ५जी कडे चालले आहेत, परंतु अनेक लोक या धावणाऱ्या युगात जगाबरोबर चालायचे सोडून….अनिश्चित अशी वाट चोखळताना दिसतात… प्रगतीकडे झोकून देऊन प्रगत होण्यापेक्षा प्रदूषित विचारांमुळे अधोगतीकडे जाताना दिसतात. नवयुवकांची भरकटलेली दिशा हे सुद्धा प्रदूषित विचारांचेच एक दुर्दैवी उदाहरण….
अंधाऱ्या रात्रीतल्या काळोखावर मात करून सूर्यनारायण आपला सोनेरी प्रकाश धरणीवर टाकतो….याच सोनेरी प्रकाशात आपल्या क्षणभंगूर आयुष्याची सुरुवात करणारी कितीतरी मनमोहक, सुगंधीत फुले जगण्याची आनंदी जीवनाची दिशा दाखवत उमलतात…बहरतात…आपला अमूल्य सुगंध हवेत पसरवून येणाऱ्या प्रत्येक क्षणाला धैर्याने सामोरे जाऊन आनंद, हास्य सर्वत्र पसरवण्याचा संदेश देतात आणि रात्र होताच….मिटल्या पाकळ्यात आयुष्य संपवून जातात…
परंतु आजची नवी पिढी…मोबाईलच्या दुनियेत हरवून जाते…. घरातून सहज मिळणाऱ्या पैशांमुळे आणि प्रदूषित झालेल्या विचारांमुळे क्षणिक आनंद(?) मिळविण्याच्या नादात दिशा भरकटून व्यसनाधीन होतात…झटपट पैसा मिळविण्याच्या स्वप्नांच्या जगात वावरताना अवैध, अनैतिक मार्गाला जातात….चुकीचे धंदे अंगिकारून…भरकटलेल्या…….प्रदूषित विचारांमुळे वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळवून अफू, गांजा, चरस आदींची संगत करतात….अवैध मार्गाने पैसा कमावून गर्भश्रीमंत झालेल्या व्यक्तीचे राहणीमान….बंगला….गाडी…आणि पैसा याचाच आदर्श घेऊन अशा माणसांसारखे श्रीमंतीचे स्वप्न पाहतात…कष्ट करून…घाम गाळून मिळालेली श्रीमंती त्यांच्या प्रदूषित विचारांना कधीच दिसत नाही….कारण श्रम करण्याची त्यांची तयारीच नसते….अशावेळी गरज असते ती योग्य दिशा दाखवणाऱ्या आदर्श विचारांची…समुपदेशनाची…
समाजात आपल्या आयुष्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीचे कौतुक करण्यापेक्षा त्या व्यक्तीचा भूतकाळ चघळत त्याचे भविष्य वर्तविणारेच जास्त झालेत…स्वतःच्या भूतकाळापासून वर्तमान आयुष्यात मिळालेलं यश आणि भविष्याकडे आशादायी वृत्तीने पाहून उज्वल भविष्य घडविणारे विचार जोपासण्यापेक्षा अनेकदा प्रदूषित विचारांमुळे स्वतःच्या हितापेक्षा पेक्षा दुसऱ्याचं अहित पाहण्याची वाढलेली वृत्ती दिसून येते. आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा लोक दुसऱ्यांच्या वर्तनाची शोभा करताना, निंदा करताना दिसू लागलेत. आयुष्यातील अनमोल असणारी रक्ताची नाती….आज प्रदूषित झालेल्या विचारांमुळे तुटताना…दुभंगताना दिसतात….जाळ लागल्यावर भगभग व्हायची…परंतु आज जिकडे तिकडे प्रदूषित विचारांनी भगभग होताना नजरेस पडत आहे. त्यामुळे वाढलेले विचार प्रदूषण प्रकर्षाने जाणवत आहे.
साहित्य क्षेत्रातही दुसऱ्याच्या साहित्याला कमी लेखणारे….अवहेलना करणारे साहित्यिक निर्माण होत आहेत….नव्या विचारांना… नव्या पिढीला चांगल्या ध्येयाला पुढे येऊ न देता ठेवणारी विचारसरणी…जन्म घेत आहे. विचार व्यापक होत चालले असताना संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून विचार प्रदूषित केले जात आहेत….त्यामुळे निर्माण होणारे नवे साहित्य आज पोठडीतच सडत चालले आहे..नव्या विचारांना संधी मिळाली..प्रसार..प्रचार झाला तरच नवे विचार कोमजले जाणार नाहीत तर ते प्रदूषित न होता नवी संजीवनी घेऊन….नवा आदर्श निर्माण करतील. अमावास्येला पडणारा काळाकुट्ट अंधार…..भयाण शांतता….पौर्णिमेच्या रात्रीतल्या टिपूर चांदण्यात आणि चंद्राच्या शितल प्रकाशात दिसत नाही…रात्र तीच असते बदललेले असतात ते त्या रात्रीतले विचार…
राजकीय आखाड्यात तर विचारांना ग्रहण लागले आहे जे कधी सुटेल हे सांगताही येत नाही….असुरी इच्छा आणि अतृप्त मनीषा यामुळे विचार विकसित होण्यापेक्षा…कलुषित होत आहेत. काळ जुना होता…राजकारणही आजच्या पेक्षा प्रभावी होते…परंतु नीती…नियम पाळून करायचे….आजकाल राजकारण म्हणजे पैशांचा खेळ…दादागिरी…दडपशाही अशा बुरसटलेल्या विचारांवर होत असते…बुरसटलेल्या प्रदूषित विचारांमुळे राजकारणाचा आखाडा बनला…सर्वसामान्य माणूस….चांगल्या व्यक्ती…प्रवृत्ती राजकारणात येत नाहीत त्यामुळे राजकारण म्हणजे समाजात पैसेवाले…गुंडशाही लोकांचे क्षेत्र असल्याचे दिवसेंदिवस दिसू लागले आहे.
पहाटे पहाटे उमळणारी कळी आपली पर्णपटले दूर सारत पाकळ्यांना अलगद खुलवत हसत हसत सूर्याची सोनेरी किरणे अंगावर झेलत…दवबिंदूंच्या वर्षावात न्हाऊन घेत….धुक्याची शाल पांघरलेल्या सकाळच्या स्वाधीन होतात….देठावर टपून बसलेली…देठासारखीच हिरवी किड न समजताच कळीला पोखरू लागते….नाजूक कोवळ्या पाकळ्या…कुरतडून…नुकतेच यौवनात येणारं तिचं सौंदर्य….ओरबाडून टाकते…पुन्हा कोणीही नजर टाकू नये असा चेहरा करून विद्रूप करून सोडते….
अगदी तसंच….
नुकत्याच तारुण्यात येणाऱ्या नवं तरुण तरुणींना…कोवळ्या वयात दिशाभूल करणाऱ्या विचारांपासून दूर ठेवल्यास….त्यांचे विचार प्रदूषित होणार नाहीत आणि समाजात येणारी आदर्श पिढी निर्माण होईल….
*विचारांचे प्रदूषण थांबवले तरंच…. मनाचे होणारे प्रदूषण रोखले जाईल…*
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी