सिंधुदुर्ग
महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन बदली धोरणानुसार सन २०१९ पर्यंत झालेल्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आंतरजिल्हा बदलीने झालेल्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आंतरजिल्हा बदलीधारक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शिक्षकांची १ ते ३ टप्प्यातील आंतरजिल्हा बदली होऊनही वेळीच कार्यमुक्त न झाल्याने त्यांच्या सेवाजेष्ठतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आंतरजिल्हा बदलीबाबत शासनाचे सहानुभूतिपूर्वक धोरण आहे. त्यामुळे ऑनलाइन बदली पोर्टलवर मोठ्या प्रमाणात बदल्या करून प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या स्वजिल्हयापासून बरीच वर्ष दूर असलेल्यांना त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी तसेच अन्य बँकांचे कोणत्याही प्रकारचे देणे नसल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. ते मिळवण्यासाठी त्यांनी आर्थिक ओढाताण करून कर्जफेड केलेली आहे. सदर शिक्षकांची मानसिक स्थिती दोलायमान झालेली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक कामकाज व कौटुंबिक परिस्थितीवर होत आहे. तसेच कोविड १ ९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त केले तर समायोजन करावयाच्या शिक्षकांना या शिक्षकांच्या रिक्त जागावर समायोजन केले तर जिल्ह्यातील शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी शाळा मिळू शकतील. तरी या विषयाचा सहानुभूतिपूर्वक विचार करून टप्पा क्रमांक १ ते ३ मध्ये बदली झालेल्या १०३ आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित व्हावेत. यासाठी आज मा.शिक्षणाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले . याबाबत यापूर्वी ही अनेक वेळा चर्चा केली असून आता कार्यमुक्ती बाबत सहानुभूती पूर्वक विचार न झाल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग मार्फत सोमवार दिनांक ५ आॅक्टोंबर २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या समोर सकाळी ११ ते ५ या वेळेत कोविड प्रादुर्भावच्या सर्व नियमांचे पालन करून आपले एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, मालवण तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर, आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षक सचिन डोळस व राकेश अहिरे उपस्थित होते.