वैभववाडी
चेतन बोडेकर लिखित ‘गावय’ या मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष कवी मधुसूदन नानिवडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. वैभववाडी दत्तकृपा प्रतिष्ठान यांचेमार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकिसरे येथे सकाळी 10.30 वा केले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित काव्यरसिकांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ही केले जाणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिंगारे, मालवणी कवी डॉक्टर नामदेव गवळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चेतन बोडेकर हे विद्यामंदिर एडगाव मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचा काव्य प्रवास हा महाविद्यालयीन कालावधीपासून सुरू झाला असून विविध विषयांवरील मालवणी व प्रमाण भाषेतील कविता सोशल मीडियावर व अन्य दैनिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘गावय’ या काव्यसंग्रहामध्ये येथील सण, परंपरा, उत्सव , राहणीमान जीवनशैली ,काही विनोदी प्रसंग त्यांनी काव्यबद्ध केलेले आहेत. सदर पुस्तकाचे प्रकाशन संवेदना प्रकाशन पुणे यांनी केले आहे.