You are currently viewing ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रदर्शनात पंतवालावलकर जुनिअर कॉलेज देवगड आणि रामगड हायस्कूल प्रथम

‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रदर्शनात पंतवालावलकर जुनिअर कॉलेज देवगड आणि रामगड हायस्कूल प्रथम

मालवण

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. १० ते १४ वयोगटातुन प्रगत विद्यामंदिर रामगडच्या साक्षी रविंद्र जिकमडे व वैष्णवी नारायण जिकमडे यांनी बनविलेल्या टाकावू पदार्थांपासून शेणी तयार करणे तर १४ ते १७ वयोगटातुन पंतवालावलकर ज्युनि. कॉलेज, देवगडच्या राहूल प्रदीप सारंग याने बनविलेल्या कार्बन सक्शन मशिनला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. उर्वरित निकाल पुढील प्रमाणे आहे.

१० ते १४ वयोगट:
द्वितीय क्रमांक-आर्यन देविदास प्रभूगावकर ( टोपीवाला हायस्कूल मालवण)– डास नियंत्रणासाठी जैविक उपाय. तृतीय क्रमांक दुर्वांक ह्रुदयनाथ गावडे (कुडाळ हायस्कूल, कुडाळ) किडनियंत्रणासाठी गोमुत्राचा वापर.
१४ ते १७ वयोगट:
द्वितीय क्रमांक : प्रणव गणपत नाईक (खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा)आपले आरोग्य व वनस्पती , तृतीय क्रमांक
पूर्वा संतोष परुळेकर व स्वरा आनंद सावंत (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
फूड इज बेस्ट मेडिसिन.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली सत्तावीस वर्षे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते. त्याच बरोबर देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव सुद्धा मिळतो.

या वर्षीच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय ”शाश्वत जीवनासाठी विज्ञान ” हा होता. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय प्रदर्शन ऑनलाईन घेण्यात आले. याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी केले. यावेळी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, राज्य समन्वयक विश्वास कोरडे, सत्यपाल लाडगावकर, गणेश मर्गज, जिल्हा समन्वयक गुरुनाथ ताम्हणकर, जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.मुश्ताक शेख म्हणाले, “विद्यार्थांनी नाविन्यपूर्ण विचार करण्यासाठी प्रेरीत झाले पाहिजे. प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधला पाहिजे आणि विज्ञानाचा उपयोग मानवी सुखासाठी केला पाहिजे.” निवड होणा-या विद्यार्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठसा उमटवावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी सहभाग़ी सर्व विद्यार्थांचे कौतुक करुन भविष्यात अनेक स्पर्धांमध्ये सहभाग़ी होवून आनंद मिळविण्याचे आवाहन केले. राज्य समन्वयक विश्वास कोरडे यांनी बाल विज्ञान परिषदेच्या उपक्रमाविषयी माहिती देवून प्रकल्प कसा सादर करावा याविषयी मार्गदर्शन केले.

दोन दिवस चाललेल्या या सादरीकरणात जिल्ह्यातील प्राथमिक गटातून ३२ तर माध्यमिक गटातून 16 स्पर्धक सहभागी झाले होते. शाश्वत जीवनासाठी परिसंस्था, शाश्वत जीवनास योग्य असे तंत्रज्ञान, शाश्वत जीवनासाठी आराखडा, विकासकार्य, शाश्वत जीवनासाठी पारंपारिक ज्ञान या उपविषयांवर विद्यार्थांनी प्रकल्प सादर केले.

या स्पर्धेचे परिक्षण श्री. सत्यपाल लाडगावकर आणि डॉ. गणेश मर्गज यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थांची राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद ठाणे येथे १८ व १९ डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व सहभागी व यशस्वी बाल वैज्ञानिकांचे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा