You are currently viewing …अन्यथा महावितरण कंत्राटी कामगारांचे १३ डिसेंबर पासून कामबंद !

…अन्यथा महावितरण कंत्राटी कामगारांचे १३ डिसेंबर पासून कामबंद !

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंतांचा इशारा

कुडाळ :

महावितरणच्या ठेकेदाराने १ डिसेंबर पासून ठेका सोडला आहे. त्या ठिकाणी महावितरणने तातडीने नवीन ठेकेदार नियुक्त करावा, तसेच कामगारांचे अन्य प्रश्न मार्गी लावावेत, १२ डिसेंबर पर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती न केल्यास १३ डिसेंबर पासून महावितरणचे कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन छेडतील, या कालावधीत “कामबंद, पगार चालू” असे धोरण राहील, असा इशारा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित कामगारांच्या बैठकीत दिला आहे.

महावितरणच्या कंत्राटी कामगारांची बैठक कुडाळ एमआयडीसी येथील महापुरुष मंदीरात संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष आनंद लाड, श्रीकृष्ण शिर्के, लोकेश साळगावकर, संजय गोवेकर, योगीराज यादव, सुधाकर परब, निलेश हुले, श्रीराम कुंभार, प्रवीण कांबळी, विनायक तांबे यांच्यासह सुमारे १५० हून अधिक कंत्राटी कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महावितरणला कंत्राटी कामगार पूरवणाऱ्या ठेकेदाराने ठेका सोडला आहे. या ठेकेदाराने या बैठकीत येऊन कामगारांचे आभार मानत आपण ठेका सोडत असल्याचे सांगितले. त्यावर अशोक सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत १२ डिसेंबर पर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त करावा, अन्यथा १३ डिसेंबर पासून कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. या कालावधीत कामगार कार्यालयात येऊन बसतील मात्र लाईनवर जाणार नाहीत. या दरम्यान ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीला महावितरण जबाबदार राहील, असा इशारा श्री. सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा