सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर
सावंतवाडी
कोरोनाच्या काळात अनेकांच्या रोजगाराची साधने बंद झाली आहेत. त्यामुळे रेशन दुकानावर मिळणाऱ्या अन्नधान्यासोबत साखर, तेल, तूरडाळ व कडधान्याचा सुद्धा पुरवठा करा, अशी मागणी डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे आजही रेशन दुकानावरील मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत. मात्र कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुद्धा कठीण बनले आहे.अशा परिस्थितीत शासन स्तरावर मिळणाऱ्या अन्नधान्याबरोबर रेशन कार्डवर साखर,तेल,तूरडाळ यांसारख्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.