सिंधुदुर्ग
कोकणचे सुपुत्र माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन गुंडाळल्यानंतर मोदी सरकार मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील खाते बदल करण्याची शक्यता आहे. भाजपा सरकार मधील माजी रेल्वे राज्यमंत्री राहिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे.
माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकार मध्येही केंद्रीयमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वे व वाणिज्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. परंतु रेल्वे सारखे जनतेच्या जवळचे खाते असूनही त्याचा फायदा ते पक्षाला देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही अशी चर्चा आहे. अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख असून ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सद्ध्या देशाची आर्थिक परिस्थिती घसरलेली असल्याने त्यातील जाणकारांची कमी मोदी सरकारला भासत असल्याने अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी त्याच क्षेत्रातील व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळे सुरेश प्रभू यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. देशातील महत्वाचा नद्या जोड प्रकल्प सुरू करून देशात हिरवी क्रांती घडविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये असताना सुरू केले होते. त्यामुळेच पुढे मोदी सरकारमध्ये सुरेश प्रभू शिवसेनेचे नेते असूनही त्यांची थेट वर्णी लागली होती.