You are currently viewing खेड्यातील सडक

खेड्यातील सडक

*माझी लेखणी साहित्य मंचच्या संस्थापिका कवयित्री आम्रपाली… आमु यांची खेडोपाडीच्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करणारी अप्रतिम काव्यरचना*

बघा प्रेमाने माझ्याकडे
खुर्चीवाले साहेब एकदा
खिसा गरम करण्यासाठी
उधडले उखडले कैकदा

शहरी रस्त्यासारखे
नकोच वस्त्र भरजरी
अंगावर चढवा साहेब
साडी एक धडाची तरी

अंग पडले उघडे माझे
लक्तरे सारी होऊनिया
खुश होईल माझे मन
तारकोल साडी लेवूनिया

नको रेडीयमचा साज
नको चट्ट्या पट्याची
टिकाऊच पाहिजे साडी
अस्सल खडी डांबराची

चकाचक शहरी सडक
जरी तुमच्या आवडीची
गोरगरिब वापरतात ना
सडक तुमच्या नावडीची

व्हावी साहेब तुमची कृपा
घ्या नं जरा माझेही मनावर
ठिगळ ही चालेल बापडीला
दया करा या अभागनीवर

आजारी, म्हाताऱ्या प्रवाशांची
दैना होते बघा माझ्यामुळे
कंत्राटदार आणि मजुरांचे
होईल भले तुमच्याचमुळे

आम्रपाली…(आमु )

प्रतिक्रिया व्यक्त करा