पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री सौ.अर्चना मायदेव यांची भक्तीपूर्ण अभंग रचना…
समाधीचा दिस
जसा ये जवळी
जमे मांदियाळी
आळंदीत
आला पांडुरंग
हाती धरूनिया
नेले ज्ञानालागी
समाधीशी
सारी भूमंडळी
शोकाकुल झाली
माऊली जाहली
समाधिस्त
संजीवन राही
भक्ता प्रेमे पाही
डोळा लवलाही
दिसू येते
देवाची आळंदी
वर्णावे ते काय
तिथे वसे माय
लेकरांची
सदा माझे डोळा
वसो तुझी मूर्ती
आणिक ती कीर्ती
नको मज
माऊलीने मज
ऐसे द्यावे दान
आनंद निधान
भेटवावे
आस दर्शनाची
लागली माऊली
जीवाची काहीली
निमा म्हणे
सौ. अर्चना मायदेव
पुणे