सावंतवाडी जलसंपदा विभागातील वर्ग १ उपविभागीय अधिकारी संतोष कविटकर हे गेली दोन वर्षे सावंतवाडी विभागात कार्यरत आहेत. विभागाशी निगडित असणाऱ्या पाणी वाटप संस्था आदींशी ते स्थानिक अधिकारी असल्याने त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपल्याच जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी असल्यावर जिल्ह्यातील कामांमध्ये चांगला दर्जा दिसून येतो, जनकल्याणाची कामे प्राधान्याने होताना दिसतात, अशावेळी लोकांकडून त्या अधिकाऱ्यांचे कौतुक होते, यथोचित सन्मान केला जातो. असाच सन्मान, सत्कार माडखोल परिसरातील लोकांनी उपअभियंता संतोष कविटकर यांच्या उल्लेखनीय कामासाठी तेथीलच एका मंदिरात चांगले काम करणारा अधिकारी म्हणून केला होता. एकंदरीत हा सत्कार करणे चांगला अधिकारी म्हणून नावाजणे आणि काहीच कालावधीत तेथीलच काही लोकांनी संतोष कविटकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याची भाषा करत निवेदन देणे हे काहीसे पचन न होणारे आहे. त्यामुळे माडखोल धरण कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करून संतोष कविटकर यांना हटविण्यासाठी केला जाणारा प्रयत्न हा कोणाचा राजकारणाचा भाग तर नाही ना? असा संशय बळावू लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून चांगले अधिकारी येत नाहीत, आले तर काहीच दिवसात बदली करून जातात किंवा दीर्घ रजेवर जातात असा आरोप पालकमंत्री दीपक केसरकर असताना वारंवार झाला आणि त्यामुळेच जिल्ह्याचा विकास रखडला होता ही वस्तुस्थिती होती. परंतु जिल्ह्यातच शिकलेले आणि उच्चपदावर कार्यरत असणारेच स्थानिक उपविभागीय अधिकारी संतोष कविटकर यांच्याबाबत केलेले आरोप पाहिले असता, आपल्याच स्थानिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण आपलेच कोकणी, जिल्हावासीय लोक का करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असताना जिल्ह्यातील लोकांनी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. उच्च पदस्थ अधिकारी एखाद्या ठिकाणी बदलीवर तीन वर्षे काम करत असतात, परंतु संतोष कविटकर हे गेली दोनच वर्षे सदर ठिकाणी कार्यरत असताना बदलीसाठी मागणी करणे किंवा बदली करणे देखील चुकीचेच आहे. जिल्ह्यातील स्थानिक असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या लोकांनीच पाठिंबा देणे आवश्यक आहे.
माडखोल येथील पाणी वाटप संस्था पदाधिकारी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करतात, त्याच अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाबाबत निळेली, पुळास येथील पाणी वाटप संस्था अध्यक्ष भाऊ धुमक, सचिव लक्ष्मण कोठावळे, पुळास उपसरपंच इत्यादी प्रशंसा करतात, प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री यांना भेटून निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधण्याचे जाहीर करतात यामुळे माडखोल येथील काही लोकांकडून वैयक्तिक वादातून श्री.संतोष कविटकर ययांच्या विरोधात राजकारण करून राजकारणातून आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका प्रामाणिक अधिकाऱ्यांविरुद्ध होणाऱ्या चुकीच्या राजकारणामुळे निळेली पुळास येथील शेतकरी जलसंपदा मंत्री आणि अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांनी काम केले नाही किंवा भ्रष्टाचार केला तरी आवाज न उठवणारे आपलेच स्थानिक लोक, राजकारणी आपल्याच स्थानिक असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा करतात त्यामुळे जिल्ह्यात भविष्यात जिल्ह्यातीलच असणारे अधिकारी तरी काम करण्यास इच्छुक असतील का? असा प्रश्न उभा राहत आहे.