You are currently viewing संपूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजनविषयक क्षेत्रावरील निर्बंध खुले, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

संपूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजनविषयक क्षेत्रावरील निर्बंध खुले, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड 19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळेनुसार खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

या आदेशात म्हटले आहे. राज्य शासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. तसेच देशातील व शेजारच्या राज्यांतील कोविड 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बंधाचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे. राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता, साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार महाराष्ट्र शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णत:  लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी खुले करण्याकरिता निर्देश पारित केलेले आहेत.

जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संबंधातील सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड -१९ सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार पुढील शर्तीना अधीन राहून, खुले करण्यात येत आहे.

१. कोविड अनुरूप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन:

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.

२. संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता:

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

ब. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

३. महाराष्ट्र राज्यात प्रवास:

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.

४. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध:

अ. चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त /बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही                कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

ब. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), संबंधित विभागातील उपविभागीय अधिकारी यांना, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

क. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड-१९ च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

५. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध:

सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, जर योग्य वाटल्यास, कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील.

६. संपूर्ण लसीकरणाची व्याख्या:

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, –

Ø  लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे; किंवा .

Ø    ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे;

किंवा

Ø  १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.

७. कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :

व्याख्या: कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरूप वर्तन (CAB) म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती (methodology) दिलेली आहे.

मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि/किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्ये करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

  1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)
  2. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.
  3.  साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
  4.  साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
  5.  योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.
  6.  पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
  7.  खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे.
  8.  सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  9. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा.
  10.  कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.
  11.  कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

शास्ती:

Ø  या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

Ø  ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक,इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९-ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

Ø  जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

Ø  जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

Ø  कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील.

सदरचा आदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा