जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना
अरे माणसा माणसा
कधी होशिल शहाणा
हरएक कामासाठी
तुला लागतो बहाणा …
आज नको उद्या करू
सदा तुझी कुरकूर
तुझ्या आळसा पाई रे
ध्येय जाई दूर दूर…
जिथे असेल फायदा
तिथे पटकन जातो
नको काम पहा तुला
सदा नाटक करतो ….
अरे तुझी रूपे दोन
नट पक्का मुरलेला
दात खायचे वेगळे
तू तो लबाडाचा चेला…
काय मिळते लबाडा
तोंडावर आपटतो
नाही मोडतच खोड
चुका पुन्हा तो करतो …
कधी झाले भले पहा
लांड्या लबाड्या करून
बाप बसला वरती
सारे पाहतो वरून…
एका हाताने हो द्यावे
दोन्ही हातात मिळते
पुण्य समोरा समोर
ह्याच जन्मात फळते …
सदविचारांचे फळ
मोठे असते गोमटे
पाप राशी उभारता
पहा नरकच भेटे..
लागे इथेच फेडावे
सारा हिशोब इथेच
पापी माणसाला लागे
उठ बसता हो ठेच..
डोळ्यासमोरच जाते
पहा सारेच वाहून
पश्चातापाची ती खाई
मरे झिजून झिजून….
लबाडास हाय हाय
सारे आपण पाहतो
तरी काही शिकवण…
सांगा.. आपण का .. घेतो ….?
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २६ नोव्हेंबर २०२१
वेळ : संध्या: ४:३७