जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक,कवी दीपक पटेकर यांचा ललित लेख
मनातलं न सांगता कळावं
वाटते सतत तू
मज सोबत असावे..
स्पर्शातून जे न समजे
भावनांतून ते उमजावे..
खरंच….जेव्हापासून तू आयुष्यात आलीस तेव्हापासून सारं जग बदललं माझं…नाजूकसं तुझं हसणं…. तुझं क्षणोक्षणी लाजणं… ओठांवर हास्याची लकेर आणतं….मनात एक ना अनेक प्रश्न उभं करतं…साधी राहणी…साधंच तुझं वागणं…नटणे मुरडणे कधी शिकलीच नाहीस का तू? भाळी सौभाग्याचं लेणं अन चेहऱ्याला पावडर….झाला तुझा मेकअप..गळ्यात मंगळसूत्र…हाती हिरव्या कंकणांची खणखण….मध्येच एखादी सोनेरी बांगडी….खरंतर अंगावरच्या सोन्यापेक्षा कितीतरी पटीने शुद्ध असलेलं शंभर नंबरी सोनं तू….त्याला कशाला हवाय नटपट अन मेकअप….साडी हीच तुझी खासियत…. रंग कोणताही असो…साडीतलं तुझं सौंदर्य अगदी अप्सरेलाही लाजवेल एवढं खुलून दिसतं…
तुझा साधेपणाच भावतो मनाला…..माझ्या अन सर्वांच्याच म्हणून तर मनात घर करतेस…तुझा साधेपणा अगदी बकुळी सारखाच…..बकुळी तशी दिसायला अतिसुंदर नसेलही….तिच्या रूपावर भाळून कुणी मागेपुढे धावणारही नाही…. तिच्याकडे आकर्षितही होणार नाही….
पण,,
ज्याने तिचा सुगंध अनुभवला….नाजूक बावऱ्या बकुळीला हातांच्या ओंजळीत अलगद उचलून घेतलं…अंगअंग रोमांचित होईपर्यंत….सुगंध नखशिखांत सर्वांगात ओतप्रोत भरेपर्यंत…अगदी मनमोहून टाके पर्यंत जपलंय….जाणलंय… सुकली तरीही सुगंध देत राहण्याचा तिचा गुणधर्म समजला….त्यालाच बकुळी समजली….तो तिच्या प्रेमात पडला केवळ तिच्या अंतरीच्या सौंदर्यावर…गुणांवर..भाळून…तू अगदी तशीच आहेस….
माझी बकुळी….
तुझ्या केसांच्या सोनेरी रेशमी बटा तुझ्या गालांशी खेळताना….मोह होतो मलाही तसाच तुझ्या गोड गोबऱ्या गालांशी लटके खेळण्याचा…वाऱ्यावर हवेत उडणारे तुझे रेशमी केस गुदगुल्या करतात माझ्या अंगाला…शहारतो..बावरतो मी…. नाजूक त्या स्पर्शाने…तू मात्र बेधुंद असतेस…तुझ्याच विश्वात हरवलेली…..गुलाबाच्या कळीसारखी फुलण्यास आतुरलेली…पहाटेच्या शुभ्र धुक्यात….धुक्याची शाल पांघरून नव्याने उमलणाऱ्या फुलासारखी अवर्णनीय….अलौकिक सौंदर्याने नटलेली…. तुझं देखणं रूप तुझ्या मुखड्यात नव्हे तर ….तुझं सौंदर्य केवळ तुझ्या अंतरंगातील गुणांमध्येच दिसतं…. त्यासाठीच हवा असतो तो तुझा निरंतर सहवास….अगदी मन मोहून…वेडावून…सुगंधीत करून टाकणारा….ओठांच्या पाकळ्यांनी ओठांतील अमृत प्राशन करणारा…
*ओठांतल्या कळ्यांनो*
*ओठांत खुलून यावे*
*श्वासातले हे गाणे*
*श्वासात धुंद गावे*
तुझ्या ओठांतल्या कळ्यांनी… माझ्या ओठात खुलुनी यावे….श्वासातले मंजुळ गाणे….श्वासात धुंद गावे…मन आतुर असतं… ओठांतल्या कळींना खुलताना पाहण्यास….अन…तुझ्या श्वासाना धुंदपणे श्वासात घेण्यास… मिठीतले ते क्षण…मी मोहरून…फुलून…बहरून अनुभवतो…गवताच्या पातीवर दवबिंदूंनी पडावे अन गवताच्या पातीला क्षणात मोहरून…शहारून सोडावं…अगदी तसंच, क्षणात अंग अंग शहारतो… श्वासातले गाणे श्वासात गात जातो….तुझ्या त्या हळुवार स्पर्शाने…अंगावर काटा उभा राहतो….तन मन सर्वस्व तुझ्याच मिठीत विसावते… अन मलाच समजत नाही मी कधी तुझाच होऊन जातो…
कधीतरी मनातील या अदृश्य भावना तुझ्या मनाने न बोलताच समजाव्या….भाव माझ्या मनातील तुझ्या नजरेने जाणावे..अतृप्त धरणीवर अवचित पावसाच्या धारांनी बरसावे आणि धरणीला प्रेमाने भिजवून जावे अगदी तसेच…..माझ्या मंतरलेल्या मनावर…तुझ्या मनात दडलेल्या …बकुळीच्या सुगंध लेवूनी लपलेल्या….निर्झरासारखे अविरत वाहणाऱ्या प्रेमाने…फेसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यासारखे कोसळत रहावे… अतृप्त….अशांत असणारे माझे मन तुझ्या अमर्याद प्रेमाने शांत करावे…. *सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातले…* अशाच माझ्या मनातल्या या भावना तुझ्या मनाला कधीतरी माझ्या मनाने न सांगताच कळाव्यात…..अन तू ही तशीच अमर्याद कोसळत रहावीस….दाटलेले भावनांचे मेघ रिते करत….निरंतर…!
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
०१/१२/२०२१