^कॉन्फिडन्स^ असावा पण ^ओव्हर^ नसावा…..पुंडलिक दळवींचा टोला
सावंतवाडी नगरपालिकेत कधी नव्हे ते सत्तांतर झालं, केसरकर यांची सत्ता असलेली नगरपालिका पालिकेतील केसरकर यांच्याच एका विश्वासू साथीदाराने साथ सोडल्याने विरोधकांच्या हाती गेली. सत्तेवर येताना जेवढी हवा विरोधकांकडून करण्यात आली त्यापैकी एकही आश्वासन विरोधकांनी पूर्ण केलं नाही. विकास काय असतो आणि तो कसा करायचा याचं साधं उदाहरण देखील विरोधक दाखवू शकले नाहीत. परंतु सावंतवाडी वासीयांनी पोटनिवडणुकीत दिलेली मते आणि सावंतवाडी वासीयांची नस हाताशी मिळाल्याने भाजपाचे प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा आत्मविश्वास दुणावला असून येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सावंतवाडीत २० नगरसेवक पदांच्या उमेदवारांपैकी तब्बल १६ उमेदवार निवडून आणणार अश्या बातम्या बाहेर येत आहेत. संजू परब यांच्या विधानाला धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी माणसाकडे “कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर नसावा” अशी कोपरखळी मारली.
नगराध्यक्ष संजू परब यांच्याच विधानाची चिरफाड करत पुंडलिक दळवी यांनी २० पैकी १६ निवडून आणणार म्हणजे पडणारे ४ कोण? हे देखील जाहीर करा म्हणत विधानामध्ये रंगत आणली आणि नक्की कोण पडणार याचाही शोध घेण्यासाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांनाच विचार करायला लावल्याचे दिसत आहे.
दीपक केसरकर यांनी एकवेळ १७ पैकी १७ जागा जिंकून किंगमेकर झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती संजू परब सावंतवाडीत करणार असा संजू परब यांना आत्मविश्वास आहे, त्यामुळेच ते सार्वजनिक रित्या हा विषय बोलून सावंतवाडीत हवा करत असल्याचेही बोलले जात असून, यावेळी नितेश राणे अथवा रवींद्र चव्हाण किंग मेकर बनणार नसून संजू परब ती भूमिका स्वतः वठवणार असल्याचे एकंदरीत चित्र समोर येत आहे. संजू परब यांच्या विधानामुळे सावंतवाडीकर मात्र नक्कीच बुचकळ्यात पडतील की……त्यांच्या वॉर्डाचा नगरसेवक तर पडणार नाही ना?