सोशल क्लबच्या नावाखाली कॅसिनो
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध व्यवसायांनी बस्तान बसविल्यानंतर हळूहळू लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कणकवली येथे अवैध रित्या जुगाराचा अड्डा म्हणून सुरू असलेल्या साईबाबा सोशल क्लबच्या बाबत अनेकदा संवाद मीडियाने आवाज उठवला आहे. सोशल क्लब या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या क्लब मध्ये रमी खेळ दाखवून पैसे लावून तिनपत्ती सारखे जुगार खेळले जातात. खाकी वर्दीतील लोक अशा सोशल क्लब मध्ये कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी जात असल्याने अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना पाठबळ मिळते. त्यामुळेच सोशल क्लब च्या नावावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात “कॅसिनो” सुरू झाले आहेत.
साईबाबा सोशल क्लब मध्ये दडलंय काय?
हे जोपर्यंत जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा निःपक्षपाती पणे शोधत नाही तोपर्यंत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे फोफावत जाणार, वेगवेगळ्या फांद्या फुटून कॅसिनो सारखी नवनवीन रोपटी तयार होत राहणार आणि विषारी द्रव्य सोडून तरुणाईला बरबाद करत राहील. चान्स टू विन या ऑनलाईन कॅसिनो चो आठ पार्टनर होते, त्याचीच कनेक्टिव्हिटी वाढत जाऊन आज ती शंभरीवर गेली. अशा अवैध व्यवसायात प्रगत तंत्रज्ञानामुळे तरुणाई ओढली जात आहे.
वरवर साधा भासणाऱ्या अवैध व्यवसायात लाखो रूपयांची उलाढाल होत असते, व्यवसाय करणारे मालामाल होतात आणि व्यवसायाकडे आकर्षित होणारे मात्र भुलभुलैया असलेल्या पैशांच्या मागे भिकारी होतात. धर्मादाय संस्थांकडून सोशल क्लब ला परवाने दिले जातात. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सोशल क्लबच्या नावाने दिलेल्या परवान्यांच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅसिनो सुरू झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट केंद्रीय गृहमंत्रालयात त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी वचक ठेवावा अन्यथा खाकीच्या माथी कलंक लागण्यास वेळ लागणार नाही.