– अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी
सिंधुदुर्गनगरी
येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जत्रा भरणार आहेत. जिल्ह्यातील मोठ्या जत्रा जसे आंगणेवाडी, कुणकेश्वर या जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली जातात. या ठिकाणी वजन व मापे यांची तपासणी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी असे आदेश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आज वेबिनारद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वजन व मापे वैध मापनचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी, पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अशासकीय सदस्य विलास कुबल यांनी ट्रान्सफॉर्मर, वीज देयक परतावा याविषयी म्हणणे मांडले. तसेच जिल्ह्यात सीएनजीचा पुरवठा सुरळीत व जास्तीचा व्हावा यासाठी पुरवठादारांना आदेश द्यावेत. दुधाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी केली. अशासकीय सदस्यांनी केलेल्या मागण्यांचा पाठपुरवा करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.