You are currently viewing हंगाम जत्रेचा…बोवाळ पावसाचा…

हंगाम जत्रेचा…बोवाळ पावसाचा…

नुकसान फिरत्या व्यापाऱ्यांचे…

त्रिपुरारी पौर्णिमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पावसाळा उतरती कळा लागते आणि भात कापणीस सुरुवात होते. दिवाळीपर्यंत पावसाळा संपून शिशिर ऋतूत हळुवार बोचऱ्या थंडीचे आगमन होते. पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या जत्रोत्सवाचे औत्सुक्य जेवढे गाववाल्यांना असते तेवढेच केवळ जत्रेत दरवर्षी दुकाने थाटून व्यापार करणाऱ्या फिरत्या व्यापाऱ्यांनाही असते. जत्रेत होणारी गर्दी आणि हौशेपोटी होणारी खरेदी यामुळे बऱ्यापैकी नफा व्यापारी वर्ग कमावतो….सुखावतो.
सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली जत्रा ही लोटांगणांसाठी प्रसिद्ध जत्रा असून मुंबई, गोवा आदी भागातून भाविक मोठ्या प्रमाणात या जत्रोत्सवात नवस फेडण्यासाठी, देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागतात, त्यामुळे सोनूर्ली जत्रा भरणार आणि व्यापार मोठ्या प्रमाणावर होणार या आशेपोटी अनेक फिरते व्यापारी दुकाने लावतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जत्रोत्सव रद्द झाले त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवर वाईट दिवस आले होते. सोनूर्ली जत्रेत होणाऱ्या गर्दीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती, परन्तु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस होत असलेल्या पावसाने जत्रोत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले, त्यामुळे जत्रोत्सवात दुकाने थाटणाऱ्या फिरत्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
जत्रोत्सवात दुकाने लावणारे हे बरेचसे व्यापारी कायमस्वरूपी धंदे करणारे नसतात, तर जत्रा हंगामात बँक किंवा सावकारी कर्ज, दुकानातून उधार समान घेऊन ते व्यापार करतात. जशी उलाढाल होईल त्याप्रमाणे कर्जाचा परतावा करतात. सोनूर्ली जत्रेत मोठ्या प्रमाणावर व्यापार होण्याची आस घेऊन व्यापारी येतात परंतु जत्रोत्सवात झालेल्या पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचे माल विक्रीस न गेल्याने आर्थिक नुकसान तर झालेच, पण पावसामुळे विक्रीस आणलेले सामान देखील भिजल्याने वाया गेले. त्यामुळे कित्येक व्यापाऱ्यांचा पावसामुळे आर्थिक तोटाच झाला. जवळपास तीन साडेतीन महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जत्रोत्सव होतात, त्यामुळे अनेक व्यापारी त्यादृष्टीने तयारी करून माल विकत आणतात व दुकानांच्या माध्यमातून विक्री करतात. परंतु पावसामुळे व्यापाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा