You are currently viewing युवकाकडून पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ

युवकाकडून पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ

शिवीगाळ करणारा सावंतवाडीतील व्यापाऱ्यांचा मुलगा?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोटांगणांसाठी प्रसिद्ध असलेली सोनूर्ली माऊली जत्रोत्सव काल थाटात पार पडला. जत्रेला होणारी प्रचंड गर्दी आणि अरुंद रस्ता यामुळे होणारी वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सोनूर्ली गावात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. सोनूर्ली न्हावेली तिठ्यावर वाहतूक नियंत्रणासाठी ३ पोलीस व १ होमगार्ड तैनात ठेवण्यात आला होता.
सावंतवाडीतील बाजारपेठेत अनेक वर्षे घाऊक व्यापार करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांचा सोनूर्ली येथे बंगला आहे. रात्री दुकानातील कामकाज आटोपून हे व्यापारी सोनूर्ली येथील बंगल्यावर जाण्यास निघाले. न्हावेली तिठ्यावर प्रवेश बंदी असल्याने कार अडविण्यात आली. “तुमची एक कार सोडली तर इतर लोकही गाड्या आत नेतील, रस्ता अरुंद असल्याने वाहतुक कोंडी होईल” असे कारण देत ती कार तिथेच पार्क करून बंगल्यावर असलेली दुसरी कार सावंतवाडीतून आलेल्या माणसांना घेण्यासाठी मागविण्याचे ठरले. त्याप्रमाणे बंगल्यावरून एक युवक दुसरी कार घेऊन घटनास्थळी पोचला, परंतु तंबाखू, दारूच्या नशेत असलेला हा युवक न्हावेली तिठ्यावर येताच त्याने वाहतूक नियंत्रणासाठी तैनात पोलिसांवर “आमची दहा लाखांची कार का थांबवली?” असा जाब विचारत अर्वाच्च भाषेत आया-बहिणीवरून शिव्यांचा भडिमार सुरू केला.
दिवसरात्र उन्हातान्हात उभे राहणाऱ्या व कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला अद्दल घडविली. सदर प्रकरणी शिवीगाळ करणाऱ्या युवकाचे व त्याच्या कारचे छायाचित्र,चित्रीकरण देखील पोलिसांनी केले आहे. त्यामुळे पोलिसांना कर्तव्यावर असताना नाहक शिवीगाळ करून सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या बड्या व्यापाऱ्याच्या मुलावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळत असतानाही डोळेझाक करून दारू तस्करी, विक्री, जुगार सारख्या अवैध धंद्याच्या वाढीस खाकी वर्दीच कारणीभूत असल्यानेच पोलिसांवर मानहानीकारक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येत असल्याचे सूर उपस्थित असलेल्या नागरिकांमधून ऐकू येत होते. दारू चरस गांजा आदी नशेच्या आहारी जात आज युवक बेताल व्हायला लागले आहेत. नशेत असल्याने आपण काय करतो याचे त्यांना भानही राहत नाही. त्यामुळे भविष्यात येणारे धोके लक्षात घेता पोलिसांनी अशाप्रकारे वर्तन करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती अद्दल घडविली पाहिजे, तरच कर्तव्य आणि जबाबदारीची त्यांना जाणीव होईल, अन्यथा एकाचा गुन्हा पचला म्हणून दुसरा देखील असा गुन्हा करण्यास मागेपुढे पाहणार नाही. न्हावेली-सोनूर्ली तिठ्यावर पोलिसांना युवकांकडून झालेल्या शिवीगाळ प्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा