मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे आयोजन
कणकवली
मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष, पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या वतीने रविवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
पद्मभूषण आणि महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्राचे लाडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे दुःखद निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे हे मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या गडकिल्ल्यांवर आणि स्वराज्यावर निस्सीम प्रेम होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे यांचे सिंधुदुर्ग वासियांवर देखील अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेम होते. म्हणुनच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छोट्या मोठ्या मुलांना आपल्या महाराष्ट्राचा व छत्रपती शिवरायांचा देदीप्यमान असा इतिहास कळावा, म्हणून ठिकठिकाणी व्याख्याने देऊन वेगवेगळ्या शिबिरांमध्ये अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जाणता राजा” या महानाट्याचे कणकवली व कुडाळ येथे भव्य दिव्य असे प्रयोग आयोजित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील कलाकारांना अभिनय करण्याची त्यांनी संधी दिली. अशा या ऐतिहासिक अभ्यासकांचे मौल्यवान विचार ऐकून सिंधुदुर्ग वासियांची मने तृप्त झाली. भावी पिढीला हिंदवी स्वराज्याचा अर्थ कळू लागला. असे असतानाच बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाले. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्वर्गीय बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करता यावी, म्हणून मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या वतीने रविवारी या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू-भगिनी, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक- विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, विविध पक्षाचे नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच पत्रकार व सर्व सांस्कृतिक कला मंडळांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे जाणता राजा महानाट्यामध्ये सहभाग घेतलेले स्थानिक कलाकार व बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर प्रेम करणार्या सर्व हितचिंतक व मित्र मंडळींनी या शोकसभेस उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली व पुष्पांजली अर्पण करावी, असे आवाहन मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष परशुराम उपरकर, सचिव नितीन तळेकर, चंद्रशेखर उपरकर, संतोष सावंत यांनी केले आहे.