*जिल्ह्यातील सत्ताधारी विकासासाठी निधी आणू शकत नाहीत ही शोकांतिका : निलेश राणे*
*🔸कुडाळ :-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी विकासासाठी निधी आणलेला दिसत नाही, आणि ते आणू शकत नाहीत, ही या जिल्ह्याची शोकांतिका असल्याचे माजी खासदार निलेश राणे म्हणाले. पणदूर येथील नूतन तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विकासाचे व्हिजन हे त्या गावच्या सरपंचाकडे असणे गरजेचे आहे, ते व्हिजन पणदूर सरपंच दादा साईल यांच्याजवळ आहे हे अभिमानास्पद आहे, त्यांचे कामच निधी खेचून आणील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पणदूर येथील नूतन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पणदूर सरपंच दादा साईल, उपसरपंच शिवराम पणदुरकर, भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, सभापती नूतन आईर, भाजपचे जिल्हा कार्यकारणीचे आनंद शिरवलकर, विशाल परब, युवा मोर्चाचे रूपेश कानडे, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, बांव सरपंच नागेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साक्षी सावंत, जिल्हा महिला सरचिटणीस रेखा काणेकर, बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल, चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देवू सावंत, माजी सरपंच शामसुंदर सावंत, महादेव सावंत, ग्रामसेविका सपना मसगे आदी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्तेतील पालकमंत्री, खासदार, आमदार आहेत पण त्यांचा उपयोग झालेला नाही. जिल्ह्याला हवा तसा निधी येत नाही. जिल्ह्यातील असा एकही गाव राहिलेला नाही ज्या गावांमध्ये एक किलोमीटर मागे रस्त्यावर खड्डा नाही. सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. आज राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची साधी चर्चा सुद्धा नाही. मात्र या सत्तेतील लोकप्रतिनिधीचा दिवस राणेंवर टीका केल्याशिवाय जात नाही. या टीका करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी वेळ घालवा, असे ते म्हणाले. पणदूर सरपंच दादा साईल यांनी ज्या पद्धतीत आपल्या गावच्या विकासाचे व्हिजन पाहिले आहे आणि त्या दृष्टीने ते विकासासाठी प्रयत्न करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे व्हिजन प्रत्येक गावातील सरपंचाने पाहणे गरजेचे आहे. आपण आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचे उदाहरण देतो पण या ठिकाणी सुद्धा दादा साईल सारखे सरपंच आहेत, जे गावाच्या विकासासाठी झटत आहेत. आज जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारतीची अवस्था खराब आहे, तिथे जावेसे सुद्धा वाटत नाही. पणपणदूर गावाच्या ग्रामपंचायतीची इतकी सुंदर इमारत असताना त्यातही आणखी चांगल्या सुविधांचे स्वप्न दादा साईल पाहत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या गावात तलाठी कार्यालय आणणे ही सोपी गोष्ट नाही, ती साईल यांनी करून दाखवली याबद्दल निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नुसत्या घरपट्टी आणि पाणीपट्टीवर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्या बरोबर पर्यटना सारख्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होऊ शकतो, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, असे राणे म्हणाले. त्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महामार्गाचा ठेकेदार कामे अर्धवट सोडून पळून गेला, त्याला पुन्हा घेऊन येऊन कामे पूर्ण करण्याची सत्तेतील कोणत्याही लोकप्रतिनिधीत धमक नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी फक्त भाजपच्याच माध्यमातून येऊ शकतो, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.