You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सौ.अर्चना घारे यांच्यावरच…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सौ.अर्चना घारे यांच्यावरच…

खास.सुप्रिया सुळे यांनी केला जिल्हा दौरा

राजकीय विशेष…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी केसरकर यांनी रामराम केल्यानंतर जी रसातळाला गेली ती गेली काही वर्षे पुन्हा उदयास आलीच नाही. मागील विधानसभेच्या निवडणुकीत पुणे येथून पवार घराण्याच्या आदेशाने जिल्ह्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याच कन्या सौ.अर्चना घारे-परब यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढीच्या दृष्टीने पावले उचलत राष्ट्रवादीची वाटचाल योग्य दिशेने सुरू केली होती, परंतु अचानक सेनेचे नगराध्यक्ष म्हणून ज्ञात असलेले सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेत आपण राष्ट्रवादीचाच अशी भूमिका घेत आमदारकीचे तिकीट मिळवले. त्यामुळे अर्चना घारे यांनी जिल्ह्यातील आपला मुक्काम पुन्हा पुणे येथे हलविला होता.

आजपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून व्हिक्टर डांटस, सुरेश गवस, अमित सामंत यांनी जबाबदारी घेतली परंतु राष्ट्रवादीचा वारू मात्र उधळला नाही. अर्चना घारे यांचे स्नेही असलेले सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सावंतवाडीत राष्ट्रवादी पक्षाची उत्तम मोट बांधून युवकांची फळी उभी केली आहे. परंतु उर्वरित जिल्ह्यात मात्र जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना राष्ट्रवादी पक्षासाठी अच्छेदिन आणता आले नाहीत. माजी राज्यमंत्री असलेले प्रवीण भोसले देखील पक्षात असूनही आणि राज्य पातळीवर वरिष्ठांशी उत्तम संपर्क असूनही राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी ते कमीच पडले, उलट जिल्ह्यात इतर पक्षांनी आपापली ताकद वाढवली आहे. मनसे पक्ष देखील चर्चेत असतो, परंतु सावंतवाडीत वगळता राष्ट्रवादी जिल्ह्यात आंदोलनात देखील उतरताना दिसत नाही.
जिल्ह्यात एकापेक्षा एक दिग्गज नेते आहेत, पवार कुटुंबियांशी जवळीक असलेले आणि पवार कुटुंबावर निष्ठा असलेलेही नेते आहेत, परंतु त्यांच्याकडून पक्ष वाढीसाठी भरीव अशी कामगिरी झालेली दिसली नाही, त्यामुळेच राष्ट्रवादी नेतृत्वाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुणे येथून पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांना पाठवत जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांदावर दिली. पुणे येथून अर्चना घारे राष्ट्रवादीची जबाबदारी पेलण्यासाठी जिल्ह्यात आल्याने माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, व्हिक्टर डांटस, अमित सामंत, एम के गावडे आदी दिग्गजांना नव्या युगाचे तरुण तडफदार नेतृत्व म्हणून छाप पाडलेल्या अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा जिल्हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. सौ.अर्चना घारे यांच्या खांदावर जबाबदारी देताना जिल्ह्यातील सर्व दिग्गजांना एकत्र आणतच अर्चना घारे यांच्याबाबत पक्षाची असलेली भूमिका कृतीतून दाखवून दिली. अर्चना घारे पुन्हा जिल्ह्यात सक्रिय झाल्याने अल्पावधीतच लोकप्रिय झालेले सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या राजकीय कारकिर्दीला बळ मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेले जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते आहेत, त्यापैकीच एक माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस. अमित सामंत जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले सुरेश गवस हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. परंतु अर्चना घारे यांचे नेतृत्व मान्य असलेले सुरेश गवस पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. तरीही राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी बाजूला सारून सर्वांना एक करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे म्हणजे सौ.अर्चना घारे यांच्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. पवार घराण्याचा विश्वास आणि असलेली जवळीक यामुळे अर्चना घारे यांना राष्ट्रवादीची शिडाची नौका वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने हाकून पैलतीरी न्यावी लागणार आहे. पक्षीय कसरती ह्या आहेतच परंतु विरोधकांची आव्हाने देखील खूप मोठी आहेत. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीची नौका अर्चना घारे यांच्या नेतृत्वात कुठेपर्यंत जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा