जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी लेखक गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
काय आतां मागू देवा
एक मागतो ते द्यावे
तुझ्या पुढे येतो तेंव्हा
मन मागते नसावे।।
तिन्ही ऋतू आयुष्याचे
भरुन मांगल्ये तु दिधले
कांहि उणे बाकी उरले
कर्म माझेच असावे ।।
शिशिर शॆशवाचा असता
पांघरूण माय पित्याचे
तुझी कृपा असल्या विण का
घर गोकुळ भासावे? ।।
ग्रीष्म प्रपंची दाटता
सखी प्रेमाचा ऒलावा
पंख प्रीतिचे तरिही
हात तुझा न सोडवे ।।
येई वर्षा अमृताची
पुत्र कन्या माये नटवी
नातवंड पाहता भरुनी
रूप तुझेच आठवे ।।
सडे सुखाचे सांडावे
तुच द्यावे मी वेचावे
कसा होउ उतराई मी
तूच गुपीत सांगावे ।।
तुझ्या पुढे येइन तेंव्हा
मन मागते नसावे ……
अरविंद