मतदार नोंदणी शिबिरा प्रसंगी महिलांच्या उपस्थितीबद्दल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडुन कौतुकोद्गार
कणकवली नगरपंचायत मधील शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची उपस्थिती
18 ते 21 वर्षे वयोगटातील युवा वर्गाचे मतदार यादीतील प्रमाण हे लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. युवावर्ग मतदान प्रक्रियेपासून जर बाहेर राहत असेल तर ही चिंतेची बाब आहे. लोकसंख्येच्या तुलनेत युवक वर्ग हा मतदान प्रक्रियेपासून बाहेर राहत असल्याने या घटकाला मतदान प्रक्रियेत येण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून व्होटर हेल्पलाइन ॲप द्वारे देखील तुम्हाला सर्वतोपरी माहिती दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी, मयत, दुबार मतदार नावे रद्द करणे, नवविवाहितांचे नावे नोंदवणे या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तसेच कणकवली नगरपंचायत मध्ये आयोजित केलेल्या या विशेष शिबिरादरम्यान महिलांच्या असलेल्या उपस्थिती बद्दलही श्री. देशपांडे यांनी कौतुकोद्गार काढले.
कणकवली नगरपंचायत च्या वतीने कणकवली नगरपंचायत च्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री देशपांडे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार प्रिया हर्णे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, नगरपंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, व्होटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून यासंदर्भात जनजागृती अधिक प्रभावी होण्याची गरज आहे. हे ऍप कशा पद्धतीने हाताळायचे त्याबाबत श्री देशपांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराला असलेली महिलांची उपस्थिती पाहून श्री. देशपांडे यांनी नगरपंचायतीच्या आयोजनाचे कौतुक करत, महिलां जवळ ही माहिती पोहोचणे म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी झाला असा अर्थ होतो. कारण महिलांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत याची प्रभावी जनजागृती होते. याकरिताच राज्यात यापूर्वी अनेक स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. येत्या काळात मतदान जनजागृती करिता फुगडी स्पर्धा घेण्याचाही मनोदय श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला. या फुगडी स्पर्धांच्या माध्यमातून महिलांनी मतदान जनजागृती वर गीत तयार करून त्याद्वारे अधिक प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडलेल्या मुद्यांवर भाष्य करताना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देशपांडे यांनी मयत झालेल्या मतदारांच्या नावाच्या नोंदी मतदार यादीतून कमी करण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून त्या व्यक्तींचे मृत्यूचे दाखले सादर केले की ही नावे लगेच कमी होऊ शकतील असेही स्पष्ट केले. तसेच याबाबत विशेष मोहीम राबवली तर हे काम गतीने मार्गी लागू शकते. असेही त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचना नुसार मतदार यादी पुननिरीक्षण कार्यक्रम राबवित असताना विशेष शिबिरे देखील आयोजित करण्यात आली आहेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नवमतदार किंवा नवविवाहित यांनी आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्या. दुबार व मयत मतदारांची नावे कमी करण्याबाबत कार्यवाही साठी आपण प्रयत्न करूया. कारण या माध्यमातून बोगस मतदान होण्याची शक्यता जास्त असते असेही श्रीमती राजमाने यांनी सांगितले. आपली मतदार यादी अचूक बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. व प्रत्येक मतदाराने मतदान यादीतील आपले नाव खात्री करून घ्या असे आवाहन श्रीमती राजमाने यांनी केले. याकरिता 30 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ कार्यरत असणार आहेत. नगराध्यक्षांनी उपस्थित केलेला मुद्द्यावर माहिती देताना प्रांताधिकार्यांनी जर दुबार नाव असेल किंवा मयत मतदार असेल तर त्यावर पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान जर आक्षेप नोंदवला तर खातरजमा करुन हे नाव कमी करता येऊ शकते. विहित कालावधीत आक्षेप नोंदवले गेले तर दुबार व मयत मतदारांची नावे निश्चितपणे कमी केली जातील असे श्रीमती राजमाने यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला या आपल्यासोबत आसपासच्या शेजार्यां कडूनही नवीन नाव नोंदणी करिता कागदपत्र घेऊन उपस्थित राहिल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून या करिता या महिलांनी पुढाकार घेतला आहे असे श्री. नलावडे यांनी सांगितले. यावेळी श्री. नलावडे यांनी मयत मतदारांची नावे कमी करण्याबाबत अनेकदा फॉर्म भरून देऊनही ही नावे मतदार यादीतील कमी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. कणकवली नगरपंचायत हद्दीत जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करण्यात साठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. याकरिता नगराध्यक्षांनी देखील या महिलांचे कौतुक केले. तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. देशपांडे यांनी नगरपंचायत च्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थिती बद्दलही नगराध्यक्षांनी त्यांचे विशेष आभार मानले. मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी श्री. देशपांडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार तात्काळ कार्यवाही करत जास्तीत जास्त प्रमाणात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोगले यांनी केले.