You are currently viewing सुट्टी …

सुट्टी …

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

नातीची ॲानलाईन परीक्षा चालू होती .. हो …घरातच
लॅपटॅापवर ….दिवाळीच्या दोन दिवस आधीची गोष्ट….
मी जवळच काम करत बसले होते … परीक्षा संपली नि
इंद्रा जोरात ओरडली … ये ऽऽऽऽऽऽऽऽ……
मी चमकून तिच्याकडे पाहिले तशी मला येऊन बिलगली …

अग… काय झालं एवढं ओरडायला … मोठ्याने हसत म्हणाली,आज पासून दिवाळीची सुट्टी लागली ..आता ..
“ नो ॲानलाईन क्लास”…अगं एवढा आनंद झाला तुला …?
हो …! आता मी खूप खूप खेळणार .. फटाके फोडणार..
आता मज्जाच मज्जा …..!

 

बघा , केवढी प्रिय आहे हो ही सुटी… लहानां पासून थोरांपर्यंत!
मी शाळेत असतांनाची गोष्ट आठवते …शिपायाने घंटेचे
टोल दिले रे दिले की .. वर्गातली वानरसेना दप्तर पाठीवर
घेऊन धूम घराकडे पळत सुटायची नि दारातून घरात दप्तर
फेकत मंडळी खेळायला पसार …लहान मुलांना खेळणे अतिशय प्रिय असते नि त्या वेळी मित्र मैत्रिणी भेटतात …
आणि मग तासंतास कुठे जातात ते समजतही नाही … इतके
कि जेवणा खाण्याचीही शुद्ध या मंडळींना नसते …

 

लहानांच सोडा … आपल्याला ही किती प्रिय असते सुटी ?
रोजचे ॲाफिसचे काम संपवून ज्या ओढीने आपण घरट्या
कडे परततो .. आठवा , घरात पाय ठेवताच स्वर्ग गवसल्याचा
आनंद होतो नि लगेच आपण ॲाफिस विसरून घरात, मुला
बाळात रममाण होतो.. ही तर काही तासांची सुटी असते..
कारण उद्या पुन्हा कामावर जायचेच असते .. तरी ही ह्या सुटीची , ॲाफिसमधून घरी येण्याची इतकी ओढ असते मग
आपल्यालाही मोठ्या सुटीची ओढ नसते का?

 

हो … असते तर .. खूप ओढ असते … बाप रे .. मोठ्या सुट्यांचं तर केवढं प्लॅनिंग असतं …? सहा सहा महिने आधी
आपण आपले मनसुबे इतरांना सांगतो …कोणाला कोकणात ,
कुणाला विदर्भात तर कुणाला टूरवर जायचे असते भारत
फिरायला .. त्याचे बुकिंग करण्या पासून तयारी करे पर्यंत
हजार गोष्टी असतात नि आपला उत्साह ही तेवढाच दांडगा
असतो ..घराघरात चैतन्याचे, उत्साहाचे जोरदार वारे वाहतात ..काय काय खरेदी करायची याची उजळणी होते.
बाल गोपाल तर .. नुसते नाचत असतात .. न केलेल्या खरेदी
वर ही भांडत असतात !

 

माझ्या घराजवळच शाळा आहे …सध्या लॅाकडाऊन मुळे बंद आहे .. पण शाळा सुरू असतांना सुटीची बेल झाली की ज्या
उत्साहाने मंडळी रस्त्यावर येतात ते पाहून मी ही काही काळ
लहान होऊन जाते नि ते बालपणाचे दिवस माझ्या नजरेसमोरून चित्रपटाप्रमाणे माझ्या नजरेसमोरून सरकू
लागतात व विलक्षण आनंद होतो मला ..
म्हणतात ना.. रम्य ते बालपण ….

 

सुटी म्हणजे विरंगुळा .. सुटी म्हणजे बदल … सुटी म्हणजे
विश्राम .. सुटी म्हणजे शांतता ..सुटी म्हणजे रिकव्हरी …
सुटी म्हणजे आनंद .. सुटी म्हणजे भेटीगाठी…सुटी म्हणजे
आशा .. सुटी म्हणजे चैतन्य …अशा अनेक उपमा सुटीला
देता येतील कारण सुटीची आपण चातका सारखी वाट
पहात असतो. कामातला बदल जसा विश्राम देतो तशी
सुटी पूर्ण विश्राम देते .माणूस ताजा तवाना होऊन नव्या उत्साहाने कामाला लागतो , त्याचा थकवा, कंटाळा पार निघून
जातो ….

 

तरी पण सुटी ही थोडा काळच हवी … ती संपल्याची हुरहुर
लागली तरच सुटीची मजा … नाही तर अती आराम ही कंटाळ
वाणाच होतो . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की , त्यातील मजाच निघून जाते …म्हणून सुटी थोडीच असलेली
बरी नाही का …?आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल तर
अधिक श्रमतास वाया घालवून चालतील काय ? तसे ही
आपण बऱ्यापैकी कामचुकार आहोत हे नाईलाजाने का होईना
आपल्याला मान्य करावेच लागेल .. कोणाला राग आला तरी
हे सत्य आपण नाकारू शकत नाही … जपानी कामगाराला
काम कमी कर असे सांगावे लागते .. त्या शिवाय का त्यांनी
अनेक गोष्टीत मार्केट काबिज केले …?एवढ्या लोकसंखेच्या
मानाने आपली किती प्रगती व्हायला हवी .. हे का कुणी सांगण्याची गरज आहे ..?
जर्मनी ,जपान, इझरायल हे देश आघाडीवर का आहेत हे आपल्याला चांगलेच माहित आहे ….

 

जाऊ द्या .. मोठा गहन विषय आहे तो .. आपण काही त्यामुळे
सुटीची मजा घालवू नये …एकूणच सुटी हा शब्द सुद्धा आपल्याला आनंद देतो हे खरे असले तरी प्रत्येकच गोष्टीत
तारतम्य पाळायला हवे हे ही तितकेच खरे आहे नाही का …?
“भरपूर काम करा … मगच सुटीची मजा लुटा…”
असा मंत्र देत मी तुमची रजा घेते ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि :१० नोव्हेंबर २०२१
वेळ : संध्या:५:२६

प्रतिक्रिया व्यक्त करा