सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व सावंतवाडी तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘तुतारी’ कविसंमेलनाचे उद्घाटक म्हणून सावंतवाडीचे युवा उद्योजक तथा कवी दीपक पटेकर यांची निवड करण्यात आली आहे. आज सावंतवाडी तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने संपन्न झालेल्या सभेत दीपक पटेकर यांच्या उद्घाटकपदी निवडीला मान्यता देण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत सचिव प्रा प्रतिभा चव्हाण, तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल कदम, जिल्हा सचिव भरत गावडे, स्वागताध्यक्ष साहित्यिका व कवयित्री उषा परब, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड.संतोष सावंत, प्रा.रुपेश पाटील, मेघना राऊळ आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी तुतारी कवी संमेलनाच्या संपूर्ण आयोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजनाची सर्व जबाबदारी स्वीकारण्यात आली असून डिसेंबर महिन्यात तुतारी कविसंमेलनात जिल्ह्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य असलेले कवी आपल्या कविता सादर करणार आहेत, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडीचे अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांनी दिली.