You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट….जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल

संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट….जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल

ओरोसच्या शक्तीकपूर स्टाईल परत बाईकच्या मटका टपऱ्यांवर हातोडा

जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक मुळातच पैशांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालयात आपल्या रुग्णास उपचारार्थ दाखल करतात. गोरगरीब रुग्णांना काहीवेळा आप्तस्वकीय नातेवाईकांकडून औषधांसाठी पैसे उधार अथवा मदत घेऊन उपचार करावे लागतात, अशातच जिल्हा रुग्णालयाच्या आजूबाजूला ओरोस येथील शक्तीकपूर स्टाईल लाल पल्सर वर फिरणाऱ्या परत बाईक याचे मटक्याचे स्टॉल लागलेले आहेत. काही रुग्णांचे नातेवाईक औषधोपचारासाठी आणलेल्या पैशात मटका खेळतात त्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. संवाद मिडियाकडे याची माहिती येताच संवाद मीडियाने ओरोसमध्ये अवैधरित्या सुरू असणाऱ्या मटका व्यवसायाविरुद्ध आवाज उठवत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधले होते.
संवाद मीडियाने दिलेल्या इत्यंभूत माहितीच्या बातमीने खुद्द जिल्हा पोलिस अधिक्षकांच्याच एरियामध्ये मटका इंडस्ट्री सुरू असल्याने पोलीस खातेच बदनाम होण्याची वेळ आली त्यामुळे ओरोसमध्ये शक्तीकपूर स्टाईल फिरणाऱ्या व सोन्याने मढलेल्या परत बाईकच्या मटका उद्योगावर घाव घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे एक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी असून आपल्या कामाची पोचपावती देताना त्यांनी परत बाईकच्या सर्व मटक्याच्या टपऱ्या बंद करायला भाग पाडले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संवाद मीडियाच्या बातमीची दखल घेत ओरोसच्या मटका व्यवसायावर कारवाई केल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मटका, जुगार आणि अवैध दारू तस्करीवर देखील लवकरच हातोडा पडणार अशी आशा वाटू लागली आहे.
ओरोस मधील मटका टपरीवर कारवाई झाल्याने आपला व्यवसाय सुरळीत सुरू राहण्यासाठी शक्तीकपूर स्टाईल परत बाईक याने ओळखीच्या व्यक्तींना भेटून धडपड सुरू केली आहे. संवाद मीडिया नेहमीच अवैध व्यवसायांच्या विरोधात बातम्यांद्वारे जबाबदार अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत असतो, सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कर्तव्यात संवाद मीडिया कसूर ठेवत नाही. जिल्ह्यातील जुगार अड्डे, गोव्यातील करमुक्त दारूची तस्करी, चरस, गांजा आदी अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी संवाद मीडियाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसायांची दखल घेऊन कारवाई केल्यास, नक्कीच जिल्हा अवैध व्यवसाय मुक्त होऊन तरुणाई उद्योग व्यवसायांमध्ये नशीब आजमावतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा