You are currently viewing प्रतिभा डेअरीकडून थकित असलेले 2 कोटी 65 लाख रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?

प्रतिभा डेअरीकडून थकित असलेले 2 कोटी 65 लाख रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?

माजी आम. उपरकर यांचा सवाल

कणकवली

जिल्हा बँक निवडणूक तोंडावर आल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष व दूध संघाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांची आठवण झाली हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी आता आयोजित केलेली संयुक्त बैठक गेल्या चार वर्षात का केली नाही? असा सवाल मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.

प्रतिभा डेअरीकडून थकित असलेले 2 कोटी 65 लाख देऊया असे दूध संघ अध्यक्ष यांनी सांगितले. मात्र त्याचे काय झाले हा प्रश्न शेतकऱ्यांनी होणाऱ्या बैठकीत उपस्थित केला पाहिजे. शेतकऱ्यांचे थकित असलेले पैसे गोकुळ व प्रतिभा डेअरी केव्हा देणार असा सवाल उपरकर यांनी केला. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर बोलत होते.

यावेळी यांच्या सोबत वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, मनविसेचे अमित इब्रामपूरकर, अनिल राणे उपस्थित होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान यांनी केले असा आरोप त्यांनी केला. कारण मंत्री असताना नारायण राणेंनी उभारलेली 4 कोटींची डेअरी बंद पाडून यांनी सिंधुदुर्गात गोकुळला आणले. त्यावेळी गोकुळच्या माध्यमातुन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या 60 योजना राबवणार असे गोकुळ ने सांगितले होते. त्यावेळी आताचे जिल्हा बँक अध्यक्ष असलेले सतीश सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शासकीय डेअरीला दूध देऊ नका गोकुळ दूध द्या याकरिता प्रयत्न केले व शेतकऱ्यांना आवाहन देखील केले होते. त्यावेळी गोकुळने ज्या 60 योजना राबवणार असे सांगितले त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही असा आरोप उपरकर यांनी केला.

गोकुळच्या माध्यमातून सध्या संस्थांना वाहतुकीतील 100 मि. ली. दूध कमी दाखवून संस्था व शेतकरी यांची छळवणूक सुरू असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. गेल्या 5 वर्षात गोकुळला दूध देऊ नका असे सांगत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीच प्रतिभा डेअरी आणली व प्रतिभा डेअरीला दूध द्या असा आग्रह केला. आता बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही काही तरी करतो दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका उपरकर यांनी केली.

राज्यमंत्री बंटी पाटील यांची भेट घेत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रतिभाकडून थकित असलेले 2 कोटी 65 लाख देऊया असे दूध संघ अध्यक्ष यांनी सांगितले. मात्र त्याचे काय झाले हा प्रश्न शेतकऱ्यांनी होणाऱ्या बैठकीत उपस्थित केला पाहिजे. शेतकऱ्यांचे थकित असलेले पैसे गोकुळ व प्रतिभा डेअरी केव्हा देणार, गोकुळच्या योजना कुठे आहेत असा सवाल दुग्धोत्पादक शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात असून, हे प्रश्न होणाऱ्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विचारण्याची गरज आहे. अशी आश्‍वासने मिळत असतील व ती पूर्ण होत असतील तर तर दरवर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुका व्हायला हव्यात.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून देखील बिल्डरांना मदत करते हे ऑडिट रिपोर्टमध्ये आले, असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. वेळ आल्यावर हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला. प्रतिभाने पैसे थकवले मग जिल्हा दुग्ध संघ प्रतिभा डेअरी वर गुन्हा का दाखल करत नाही? दूध संघ मूग गिळून गप्प का? असा सवाल उपरकर यांनी केला. ठराविक आपल्या लोकांना व ठराविक संस्थेना या बैठकीला बोलावले. जर दुग्धोत्पादनात संदर्भात चर्चा करायची असेल तर जिल्ह्यातील सर्वच दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रण का नाही? असाही सवाल उपरकर यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा