महाराष्ट्राची जादूई नगरी, कलेचं भांडार पुणे येथील ज्येष्ठ लेखक, कवी श्री.अरुणजी पुराणिक यांचा जीवनाचे मर्म सांगणारा अप्रतिम लेख
सुखानंतर दुःख किंवा दु:खानंतर सुख हा जगाचा नियम आहे. अंधारानंतर प्रकाश , पौर्णिमेनंतर अमावास्या हा कालक्रम हेच दर्शवितो. *जगी सर्व सुखी असा कोण आहे?* असा प्रश्न रामदास स्वामी विचारतात , तर *सुख पाहता जवापाडे , दुःख पर्वताएव्हढे* असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. याचा अर्थ सुख अगदी थोडं …. म्हणजे अगदी जोंधळ्याच्या दाण्याएव्हढं …. असतं. दु:खमात्र पर्वताएव्हढे असतं . सुखात हुरळून जाऊ नये आणि दुःखात होरपळून जाऊ नये . जगात दुःख नाही असे परमहंस गतीला पोहोचलेले साधू सन्यासी सोडले , तर या जगात ज्याला दुःख नाही असं कुणीही नाही.
मनुष्याचा जन्मच मुळी दुःखातून होतो. त्या क्षणी प्रसव वेदना माता सहन करते , तेंव्हा बाळाचा जन्म होतो , आणि बाळ रडत जन्माला येते. या दु:खामागून सुख येते ….या सुखात भवितव्याचे विचार असतात…. जीवनाचा आधार असणारा आशावाद असतो….पण जगात येणारं बाळ या जगाशी दुःखाचा सामना करण्यासाठी आपण जन्मलो आहोत हे सांगण्यासाठी पहिला टाहो फोडतं ..!
सुखाचा आनंद मिळवावयाचा असेल तर दुःखाची प्रचिती यावी लागते. ज्यात प्रतिकूल संवेदना असतात , त्याला दुःख म्हणतात.
मानसिक आणि शारीरिक अशी दोन प्रकारची दुःखे असतात. शारीरिक दुःख हे शरीराला होणाऱ्या जखमा , अपघात , यामुळं होतात , तर मानसिक दुःखाची अनेक कारणे असतात. पारतंत्र्य , भोग , मानभंग , दारिद्र्य , शत्रू , नालायक अपत्ये , विवाह प्रश्न , निवासाची परवड , वाईट संगत , व्यसनाधीनता , काम , क्रोध , मत्सर , लोभ इत्यादी अनेक कारणे ही मानसिक दुःखाची उगमस्थाने आहेत.
सुख टिकवीता येत नाही आणि दुःख टाळता येत नाही असं हे मानवी जीवन आहे . सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखातून सुटका होतेही , पण काही दुःखे अशी असतात की ती बराच काळ त्रास देतात….देत राहतात….*काळजाचा ठावही घेतात…….*
म्हणून संत जनांचं सांगणं आहे की …..
*नामस्मरणाचा अवलंब करा*
*परमेश्वरावर विश्वास ठेवा*
*साधू संतांची संगत धरा*
*धार्मिक ग्रंथांचं वाचन करा*
या सर्वांमुळे दुःख नाहीसे होईल असं नाही , पण हलकं मात्र नक्कीच होईल…..
आपण जन्माला येतो तेंव्हा रडत येतो आणि आपण जग सोडून जातो तेंव्हा आपल्या सभोतालचे बाकीचे रडत असतात…..
ह्या दोन रडण्या मधला काळ जो असतो तो हसण्याचा आणि हसविण्याचा ….
*म्हणून हसा आणि हसवत रहा*…….
*।। तथास्तू ।।*
*अरुण त्रिंबक पुराणिक , पुणे*
*मो. नं . ९७६६५४९६२०….*