सोशल क्लबच्या नावाखाली जुगार सुरू करण्याचे आखले जातात मनसुबे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत. जिल्ह्यात जुगार, मटका, दारू तस्करी, गांजा, चरस आधीचे व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. जिल्ह्यात सोशल क्लब च्या नावावर बऱ्याच ठिकाणी तिनपत्ती, अंदरबाहर सारखे जुगार खेळले जात आहेत. संवाद मीडियाने जिल्ह्यातील खाकीच्या मेहरबानीवर सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांची पोलखोल करत मिडियामधून बातम्या देत आवाज उठविल्याने एलसीबी कडून कोंडुरा सारख्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगाराच्या मैफिलींवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात एलसीबी कडून धाड टाकण्यास सुरुवात झाल्याने आणि संवाद मीडियाने वारंवार जुगार मटका आदी अवैध धंद्यांबाबत आवाज उठविल्याने जुगाराच्या बादशहांकडून सिंधुदुर्ग मध्ये सोशल क्लब सुरू करून सोशल क्लब च्या नावाखाली जुगार सुरू करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. कणकवलीत खाकी आणि काही राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादावर साई सोशल क्लब च्या नावाखाली जुगार सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी याची एका राजकीय व्यक्तीने तक्रार देखील केली आहे. परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक सक्षम असून देखील कणकवलीत सुरू असणाऱ्या साई सोशल क्लब वर कारवाई का करत नाहीत याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
कणकवलीत खुलेआम सुरू असणारा जुगाराचा साई सोशल क्लब इतरत्र जुगारांवर धाडी पडत असल्याने जिल्ह्यात आपल्या शाखा खोलण्याच्या तयारीत आहे. साई सोशल क्लब कणकवलीचा परवाना वापरून त्याच्याच आधारे जिल्ह्यातील कासार्डे, विरण येथे सोशल क्लब च्या माध्यमातून जुगार सुरू करणार आहे. सोशल क्लब या गोंडस नावाखाली कॅरम, पत्ते आदी खेळ दाखवून त्याजागी सिंधुदुर्गात सुरू होत आहेत जुगार.. टिंगल मेंथेरोच्या मालकीचा असलेला साई सोशल क्लब जिल्ह्यात आपल्या शाखा विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे. एकाच पारवान्यावर कासार्डे, विरण आदी ठिकाणी सोशल क्लब च्या नावाखाली जुगार सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने जिल्हा भविष्यात अवैद्य धंद्यांची बाजारपेठ तर होणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक याची दखल घेणार की जिल्हा अवैध धंद्यांसाठी आंदण देणार हाच सवाल शिल्लक राहिला आहे.