बांदा
डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. आज विझविताना रुपेश केसरकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचे बंधु गंगाराम केसरकर यांच्या हाताला व पायाला भाजल्याने दुखापत झाली. या आगीत घरातील सामानासह दोन दुचाकी जळून खाक झाल्यात. ऐन दिवाळीत केसरकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांना रात्री उशिरा आग विझविण्यात यश मिळाले. आज सकाळी बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल रात्री उशिरा विद्युत रोषणाई करण्यासाठी घराच्या दारासमोर लावलेल्या चायनामेड दीप माळेने पेट घेतला
माळेच्या खाली असलेल्या दुचाकींवार आगीची ठिणगी पडल्याने इलेक्ट्रिक बाईक व ऍक्टिव्ह दुचाकीने पेट घेतला. यावेळी रुपेश केसरकर हे आपली पत्नी, मुलगा व वृद्ध आईसह घरात होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना घराच्या पाठीमागील दरवाज्यातून सुरक्षितरीत्या घराबाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा आपले बंधू गंगाराम यांच्यासह आग विझविण्यासाठी घरात शिरले.
मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. घरात साठून ठेवलेल्या मिरच्यांची पेट घेतला. मिरचीच्या धुराने रुपेश केसरकर यांचा श्वास गुदमरल्याने ते तेथेच कोसळले, त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर गंगाराम केसरकर यांच्यावर बांद्यात उपचार करण्यात आले. स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ यांनी उशिरा आग विझवली.