पारावरच्या विठ्ठलाचे एलसीबी ला ओपन चॅलेंज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगार मटका दारू अंमली पदार्थांचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत. जिल्ह्यात पोलिसांना आव्हान ठरणारे हे अवैध व्यवसाय खाकी वर्दीच्याच आशीर्वादाने सुरू असल्याने अनेकदा धाड पडण्याच्या आधीच त्यांना सूचना मिळते आणि जुगाराच्या बैठका जागा बदलून सुरू ठेवल्या जातात. संवाद मीडियाने जुगाराच्या बैठका कुठे बसतात इथपासून किती वाजता उठणार आदी इत्यंभूत वार्ता बैठका बसण्याच्या आधीच देत जुगाराच्या बादशहाना सळो की पळो करून सोडले आहे.
पारावरच्या विठ्ठला सहित सर्वच जुगारी यांनी संवाद मीडियाचा धसका घेत बैठका बसविताना जास्तच काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. फोंडा येथील पारावरचा विठ्ठल रात्री ८.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळींना एकत्र बोलावतो, सर्व एकत्र झाल्यावर त्यांचे मोबाईल बंद करतो. त्यानंतर बैठकीसाठी आलेल्या खेळींना बैठकीचे ठिकाण एक सांगतो आणि बैठक तिसरे कडेच सुरू करतो. या बैठकांना केवळ स्थानिक तक्षीमदार घेतो, बाहेरील कोणालाही संधी देत नाही, त्यामुळे पारावरच्या विठ्ठलाच्या जुगाराच्या मैफिली रोज रात्री ८.३० वाजल्यापासून पहाटे ४.०० वाजेपर्यंत निर्धास्तपणे चालतात. रोज रात्रीच्या जुगाराच्या बैठकीमध्ये पारावरचा विठ्ठल दोन नंबर पट मारतो. खाकी वर्दीतील झारीतील शुक्राचार्य “धापू वरात” व राजकीय नेत्यांच्या जीवावर पारावरच्या विठ्ठलाने मला पकडून दाखवा असे खुद्द एलसीबी लाच ओपन चॅलेंज दिले. पारावरचा विठ्ठल “राजकीय आशीर्वाद” आणि खाकीचा शिलेदार “धापू वरात” यांच्या पाठिंब्यामुळे जुगाराच्या खेळींमध्ये जुगाऱ्यांपुढे आपण कसे पोलिसांना आपल्या ताब्यात ठेवतो याबाबत बढाया मारत असतो.
जिल्ह्यातील जुगाऱ्यांची इत्यंभूत बातमी संवाद मीडियाला मिळते आणि त्यामुळे ठरलेल्या बैठकांच्या नियोजनावर पाणी फिरते. त्यामुळे आपल्यातीलच कोणीतरी जुगारी संवाद मीडियाला बातमी पुरवतो याच संशयाने पारावरच्या विठ्ठलाने खेळायला येणाऱ्या जुगाऱ्याचे मोबाईल फोन आपल्या कस्टडीत ठेवत निर्धास्तपणे जुगाराच्या बैठका कशा पार पाडल्या जातील याची काळजी घेत असतो. त्यामुळे पारावरचा विठ्ठल आणि त्याच्या जुगाराच्या बैठका म्हणजे झारीतील शुक्राचार्य खाकीचा शिलेदार “धापू वरात” याला मागमूस न लागता कशा उध्वस्त करता येतील हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलसीबी समोर एक आव्हान ठरले आहे.