देवबाग मधील “मत्स्यगंधा समर्थ थिएटर” चे शुक्रवारी उद्घाटन
मालवण :
मालवण मधील सरस्वती चित्रमंदिर बंद झाल्यानंतर मालवणच्या मनोरंजन क्षेत्राला आलेली अवकळा दूर होणार आहे. तालुक्यातील देवबाग मध्ये पी अँड पी समूह प्रा. लिमी. देवबाग ग्रामपंचायत यांच्या वतीने मालवण तालुक्यातील पहिले मिनिप्लेक्स खुले होत आहे. शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी या मिनिप्लेक्सचा शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने कळसूत्री बाहुल्या, दशावतार आणि गजानृत्य या कोकणातील तिन्ही पारंपरिक कलांचे एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण पहाण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच नवनिर्माण हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याची संधी देखील यानिमित्ताने मिळणार आहे.
कोकणच्या सांस्कृतिक कलांना एक वेगळी परंपरा आहे. दशावतार, गजनृत्य, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अशा एक ना अनेक पारंपरिक कलांचा आनंद पर्यटकांना आता मालवण तालुक्यातील देवबाग येथे घेता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांची सांस्कृतिक कलांची परंपरा जपणाऱ्या आणि ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या देवबागच्या मत्स्यगंधा समर्थ थिएटरने खास पर्यटक तसेच उद्योजक, व्यावसायिकांसाठी एक वेगळी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. येथील मिनीप्लेक्सचे उद्घाटन शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी देवबाग सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाचे मालवण येथील शाखा व्यवस्थापक राम गोपाल यादव, कणकवलीचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे उपस्थित राहणार आहेत.