You are currently viewing ४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’चे आयोजन

४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’चे आयोजन

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी ‘सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’ (SPL) आयोजित करण्यात येत आहे. या लीग स्पर्धेचे आयोजन मालवण येथे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. याबाबतची अंतिम रूपरेषा १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या सभेत जाहीर करण्यात येईल अशी माहिती मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनचे वासुदेव वरवडेकर यांनी ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग चे आयोजन करण्यात यावे अशी संकल्पना मांडली होती ज्या माध्यमातून ज्येष्ठ क्रिकेटपटूंना सध्याच्या काळातील प्रीमिअर लीग सारख्या स्पर्धेत खेळण्याचा आनंद घेता येईल.
या संकल्पनेला जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या सभेत या स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग स्पर्धेच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यासाठी मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सिल्वर सँड हॉटेल मालवण येथे सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पप्पू परब, उमेश मांजरेकर, बाबा परब, रिझवान शेख, सुशील शेडगे, वासुदेव वरवडेकर, मंगेश धुरी, आशिष शेलटकर, नीलकंठ मालणकर, विक्रम मोरे, आपा मालंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी २६ रोजी जिल्हा कमिटीच्या सभेतील प्रीमिअर लीगचे आयोजन करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मालवण येथे ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी प्रीमिअर लीग अयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ क्रिकेटपटू वासुदेव वरवडेकर यांच्या संकल्पनेतून ४५ वर्षांवरील ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी SPL (सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग) च्या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनासाठीच्या नियमावलीबाबत निर्णय घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा