अमानुष कत्तल आपल्या डोळ्यासमोर होतेय! वेदनेच्या आक्रोशातून भारतीय गोवंश वाचवायला सिंधुदुर्गातून सर्वांनी पुढे यायला हवं…!!
गायीच्या, अर्थातच गोमातेच्या हत्येसाठी हात तोडण्याची शिक्षा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत आवडत्या किल्ल्याचे नाव धारण केलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा! पण आज सर्रास आणि बिनदिक्कत हवाही मिळणार नाही अशा बंदिस्त कंटेनरमधून गोधन खाटीकखान्यात नेण्याच्या प्रकारामुळे हा जिल्हा पुन्हा बदनाम होतोय.
कालच्या कुडाळमधल्या गोधन भरून नेताना अडवलेल्या “त्या” घटनेतून खूप काही शिकायला मिळालं. अजूनही मिळतं आहे. आणि भविष्यात काय काय शिकायला आणि पहायला मिळेल माहीत नाही.
मी काही या गोवंश बचाव चळवळीचा कार्यकर्ता वगैरे नाही. यातल्या कायद्याचाही मी चिकित्सक वा अभ्यासक नाही. फक्त आपण सगळे आईच्या आणि गायीच्या दुधावर पोसलेले आहोत आणि त्या दुधाचे उपकार आपल्यावर आहेत याची जाण ठेवणाऱ्यांपैकी मी नक्की एक आहे. म्हणूनच जेव्हा बैल भरलेला एक अवाढव्य कंटेनर बैल आपल्यासमोरून जात आहे याची क्षणमात्र चाहूल लागली तेव्हा पाठलाग करून अडवताना मला पुढची आव्हानं, धोके याचा कसलाच विचार मनात आला नाही.
एक गोष्ट मात्र तिथेही स्पष्ट झाली की जी आग माझ्या हृदयात होती ती अनेकांच्या आहे. अन्यथा कंटेंनर अडवल्यानंतर काही वेळातच तिथे शेकडो लोक जमले.. पोलीस आले नसते तर तसाही तो कंटेनर उचलूनही पोलीसस्टेशनला आणतील असा राग आणि त्वेष रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वसामान्य लोकांमध्ये दिसला. बाकी कितीतरी क्लेशदायक गोष्टींमध्ये ही एवढी बाब प्रचंड आशादायक वाटली.
कुडाळच्या पोलीस स्टेशनच्या प्रांगणात प्रचंड गर्दी जमली होती. जय श्रीरामचे नारे लागत होते. परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून दंगल नियंत्रक पथकदेखील मागवण्यात आले. पहाटे तीन वाजेपर्यंत कंटेंनरमधली गुरे जवळच्याच सरसोली धाममध्ये उतरून घेईपर्यंत ही गर्दी पांगली नव्हती. कदाचित अनेक वर्षांच्या अव्याहत वाईट अनुभवानंतर या चांगल्या घटनेबद्दलची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असावी.
पण… त्या गर्दीत बेभान होऊन पुढे आलेले अनेक सूर्याजी मालुसरे होते, तसेच काही सूर्याजी पिसाळपण होते. किती दुर्दैव! जय श्रीरामच्या नाऱ्यामागे गायीला गोमाता मानणारा त्वेष होता, तसेच कत्तलीचा (स्थानिक बोलीभाषेत गुरांच्या हा कत्तलीला जनावरे “कटावा”ला नेणे हा शब्द रूढ आहे) धंदा या गदारोळात पुन्हा कसा मार्गाला लागेल याचा विचार करणारे निर्लज्ज नतद्रष्ट आणि त्यांचे पडद्याआडचे समर्थकही बरेच होते. त्यादिवशीच्या रोषापुढे त्यांनी फारसा फणा काढला नाही. पण शेवटी ही एक आर्थिकदृष्या अनेक वर्षे रुळलेली मजबूत साखळी आहे, जी त्या क्षणीदेखील उद्यापासून पुन्हा हा सेटल धंदा सुरू करणारच अशा उन्मादात वावरत होती. गोवंश बचाव हा विषय हिंदूंच्या आत्मीयतेचा असला तरी विषय हिंदू-मुस्लिम तेढाचा अजिबात नाहीय. गंदा है पर धंदा है म्हणत पोटासाठी धर्म, जात, आय-माय- आणि गायसुद्धा विकण्याची किळसवाणी मानसिकता केलेल्या हिंदूंमधलेच दलाल यात आहेत. यावर सविस्तर लिहिनच, पण आज हा लेखाचा विषय नाही. फक्त यात किती घृणास्पद निर्लज्जता आहे हे स्पष्ट करण्यापुरते सांगतो की या कटावाच्या धंद्यात असलेले मुसलमान आपली धंद्यातली नैतिकता (??!!) पाळत गायी कापण्यासाठी नेत नाहीत, फक्त बैलच नेतात. पण या धंद्यातले हिंदू गायी आणि पाडसे पण सोडत नाहीत.
अनेक माझे अभिनंदन करण्यासाठी फोन आले, तेव्हा या प्रकरणाची गावोगावीची व्याप्ती कळली, पोलीस यंत्रणेतले पक्के विणले गेलेले कच्चे धागे पण कळले. कायद्याच्या मर्यादा कळल्या. कायद्याची हतबलता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी आदी दिग्गजांचा सहभाग असलेली पण दीर्घकाळ साधी मीटिंगही न घेता निद्रावस्थेत पहुडलेल्या अनिमल्स कृऍलिटी प्रिव्हेंशन ऍक्टखाली काम करणारी प्राणीक्लेश निवारण समितीची निष्क्रियताही समजली. या दोन्हीवरही पुढे सविस्तर बोलू.
पण काल पहिल्यांदाच जेव्हा तीस जनावरे एकत्र ताब्यात घ्यायची वेळ आली तेव्हा चांगल्या गोशाळेची उणीव जाणवली. कागदावरचे चित्र जनावरांचे पोट भरू शकणार नाही. वास्तव प्रत्यक्ष जाऊन आजच पाहीन, पण अनेकांनी काल सरसोली धाममध्ये ठेवलेल्या त्या तगड्या आणि उमद्या पाड्यांना तिथे चारापाण्याची सोय नीट होत नसल्याबाबत सांगीतले आहे. पाडे काल दिवसभर उन्हात तळमळत होते असेही काही प्राणीमित्रांनी सांगितले.
दुसरीकडे, हा प्रकार रोखण्यातली अडचणही मोठी आहे. बैल बाजारात विकण्यासाठी नेला जात आहे की कटावासाठी हे तिथे जाईपर्यंत सिद्ध करता येत नाही. उघड्या टेम्पोतुन बिनदिक्कतपणे एक किंवा दोन बैल अगदी आरामात या कसायांच्या स्थानिक कलेक्शन अड्डयांपर्यंत नेता येतात. आणि मग तिथून खास बनवलेल्या कंटेनर मधून किंवा मोठ्या बंदिस्त ट्रकमधून खच्चून भरून ही जनावरे खाटीकखान्यात नेली जातात. कसलेही पेपर वा परवाने नसताना ही वाहतूक सुरळीत कशी होते हे सुज्ञांस सांगणे न लगे! यावरही वेळोवेळी बोलूच. कारण काल एक कंटेनर पकडला असला तरी यांच्यासाठी आजही ऑल लाईन क्लियर असल्याचेच समजते. एकीकडे या विषयात तक्रार न देण्यासाठी त्या गर्दीतही मला पाच लाखांची ऑफर देणारी कोणीतरी दाढी समोर येते. त्याचवेळी तुम्ही धाडी घालू शकत नाही, गाड्या थांबवण्याचे अधिकार कायद्याने तुम्हाला दिलेले नाहीत, तुम्ही अडचणीत याल असे प्रेमाने समजवणारी कायदारक्षक यंत्रणाही समोर येते. आव्हानं सोपी नाहीत हे स्पष्ट होते. पण सोपी असतील तर त्यांना आव्हाने तरी का म्हणावीत?
शेतकऱ्यांना बैल पोसणे परवडत नाही म्हणून ते विकले जातात, आणि हे विकलेले बैल खाटीकखान्यात नेले जातात असे सांगितले जाते. कोकणातला ग्रामीण शेतकरी आपला बैल कापण्यासाठी कधीच विकणार नाही म्हणून बोगस शेतकरी निर्माण करून त्याच्याकडून तो शेतीसाठी म्हणून विकत घेतला जातो. असाच एक फसवून घरी पाळण्यासाठी म्हणून घेतलेला बैल जेव्हा खाटीकखान्यात नेला जात होता, तेव्हा त्याच्या मूळ मालकाला खबर लागताच तो पाठोपाठ परराज्यात पोहोचला आणि तिथून तो पुन्हा पन्नास हजार नगद मोजून तो माघारी कसा आणला याचीही खमंग चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती.
अर्थात आता चर्चेपलीकडे जात यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. एका कंटेनरमध्ये तीस चाळीस जनावरे (दुर्दैवाने बैलासोबत गायी आणि पाडसे असा संपूर्ण गोवंश) भरला जात असेल आणि मागची काही वर्षे अशा पद्धतीने सगळी यंत्रणा खिशात घालून खुलेआम वाहतूक होत असेल, तर किती हजार गोधन म्हणजेच गायीगुरे फक्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नाहीशी होत असतील याची कल्पना करावी. भारतीय वंशाचे गोधन कोकणातून समूळ नष्ट होत चालले आहे आणि आपण डोळे झाकून बसलो आहोत. या बेमुर्वत यंत्रणेसमोर हतबल होऊन बसलो आहोत.
ही हतबलता झटकून टाकली पाहिजे. हे गोधन वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. काल कंटेनरमधून बैलपाडे उतरण्यासाठी जी तरुण मुले रात्रभर जीव घालवत होती ती जनावरांवर प्रेम करणारी पिढी होती. दुसऱ्या दिवशी गरज नसतानाही त्या बैलांची काय दुरावस्था आहे हे पाहून येत त्याबद्दल निराशेने भडभडून बोलणारी ही मुले आहेत, एवढेच नव्हे तर आमच्याकडे आहे ती जागा आम्ही देतो, फक्त चाऱ्यापाण्याची काहीतरी व्यवस्था करूया, पण आता ही कत्तल रोखुया. भले ही विकली जाणारे जनावरे शेतकऱ्यांकडून विकत घेऊन ती आपण कशी पाळू शकतो, शेतीसाठी भाड्याने कशी देता येतील, उद्या शेणापासून रंग, प्लास्टर, विविध वस्तू बनवण्याचा उद्योग सुरू झाल्यास काही आर्थिक गणित बदलेल का यावरही अनेकांचे विचारमंथन होते.
मी या विषयातला तज्ञ नाही हे पुन्हा सांगतो. पण भारतीय गोवंश वगैरे मोठ्या शब्दांपेक्षा कंटेनरमध्ये मरून पडलेला, मान वळवून उघड्या डोळ्यांनी दरवाजाकडे सुटकेच्या आशेने पाहत जीव सोडलेला तो पाडा आणि रोज उलटे लटकून हाल-हाल करून कापल्या जाणाऱ्या त्या सगळ्या मुक्या गायीबैलांच्या पाहू न शकत असलेल्या वेदना मला मनापासून अस्वस्थ करतात. आज वसूबारस .. गोवत्स पूजनाने आपण दिवाळी साजरी करणार आहोत. प्रत्यक्षात त्यासाठी काही करता येईल का याचा विचार आणि संकल्प आपण आजच्या दिवशी काय करू शकतो का? संकल्प पुढची पायरी, पण विचार करायला काय हरकत आहे. काल शेकडो फोनमधून आपण आपल्या भावना व्यक्ती केलात, आज संकल्प व्यक्त केलात तर नक्की आनंद होईल, वसुबारस खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल आणि दिवाळीलाही एक मांगल्य प्राप्त होईल!
सर्वांना शुभसंकल्पीय दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!
—- अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575