You are currently viewing वसुबारस

वसुबारस

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांनी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे “वसुबारस” यानिमित्ताने आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाचे औचित्य साधून लिहिलेला अप्रतिम लेख

*🪔 दिन दिन दिवाळी 🪔*
*!! वसुबारस !!*

आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे.गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे.उत्सवाला धास्तीची किनार आहे.पण सर्व नियम पाळत,स्वच्छता राखत,अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत.सामाजिक अंतर राखत पण मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत.कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते.हा तर ‘दिवाळीचा सण’
.दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे.मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव,नात्यांचा उत्सव,लक्ष्मीचा उत्सव,निसर्गाचा उत्सव, विजयाचा उत्सव असे अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.
अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो.त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’. यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते. लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे ” सुरभि ” .हीच गोमातांची अधिदेवता आहे. दिवाळीत हिचे पूजन केले जाते.एरवी सुद्धा ‘ गो-ग्रास ‘ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो. वसुबारस तर काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.
यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे,निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा मुख्य संदेश दिलेला आहे.हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे.अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो ,त्यातलाच हा एक दिवस.या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात.तिथे पणत्या लावतात. मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात.ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात.गाण्यांमधून गाईच्या गुणांचे, शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते.या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.
कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे.वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते.आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे.कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही. ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे.निसर्गाचे रक्षण,संवर्धन केलं पाहिजे.हा संदेश या सणातून घ्यायचा आहे.निसर्ग संवर्धन मोहीम, वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे. ” निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.
तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊ या.त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करू या. दिवाळीची सुरुवात आनंदाची करू या.
शुभ दीपावली. 🙏

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा