जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका सौ भारती महाजन-रायबागकर यांचा दिवाळीचे वैशिष्ट्य विशद करणारा अप्रतिम लेख
दक्षिणेकडची काही मोठी राज्यं सोडली तर जवळपास संपूर्ण भारतात साजरा होणारा एक महत्वाचा सण…दीपावली
चातुर्मास सुरू झाल्यावर लहान-मोठे सण उत्सव साजरे करतांना उंबरठ्यावर येऊन ठेपणारा आणि चातुर्मासाच्या सांगतेकडे सरकणारा असा हा सण…दीपावली
अमाप उत्साहाचा आणि अतीव मांगल्याचा आबालवृद्ध सगळ्यांनाच आवडणारा असा हा सण…दीपावली
प्रत्येक नात्याचा सन्मान करणारा असा हा सण…दीपावली
धार्मिकतेचे फारसे अवडंबर नसणारा तरीही पावित्र्याने नटणारा असा हा सण…दीपावली
घरदार काठोकाठ प्रकाशाने भरणारा असा हा सण…दीपावली
दीपावली म्हणजे…दिव्यांची ओळी… लौकिकार्थाने पणतीत तेल घालुन कापसाची वात लावणं म्हणजे दिवा…अशा भरपूर दिव्यांची रांग म्हणजे दीपावली…
असो तिमीर हर तऱ्हेचा
परी उजेड पुरे पणतीचा
जर पेटवु पणतीने पणती
मग त्या तमाची कोठे गणती
पण त्याआधी याच्या तयारीची सुरुवात होते स्वच्छतेने...घरातले कानेकोपरे होतात स्वच्छ…लख्ख…
आणि मनातले…? किल्मिषांची जळमटं काढण्यासाठी…असा झाडु मिळवणं जरा कठीणच…तरीही…
*निर्मळ मनदीप दीप:कार…*
शिवाय कितीतरी अदृश्य सत्कृत्यांच्या… जाणिवांच्या...संवेदनांच्या…दिव्यांच्या रांगा…लावू शकतो आपण… अभावग्रस्तांच्या आयुष्यात…दान दीप लावुन…त्यांचं अंधारलेलं जीवन उजळण्यासाठी…
*दान दिव्या दीप:कार…*
आपल्या अंगणात काढलेल्या रंगीत रांगोळी प्रमाणेच रंग भरू शकतो आपण रंग विस्कटलेल्यांच्या आयुष्यात…त्यांना धैर्य देऊन…त्यांचं जीवन रंगीत होण्यासाठी…
*धैर्य दिव्या दीप:कार…*
आपल्या अंगणात उंच टांगलेला आकाश कंदील…जणू एखाद्या दीपस्तंभाचे प्रतीक…शिक्षण-वंचितांच्या आयुष्यात… लावु शकतो आपण ज्ञानदीप…स्वतःच दीपस्तंभ होऊन…
*ज्ञान दिव्या दीप:कार…*
नैसर्गिक / मानवनिर्मित आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लावु शकतो आपण सेवा दीप…
*सेवा दीप दीप:कार…*
निराशेच्या गर्तेत खोल खोल बुडणाऱ्यांच्या पाठीवर हात ठेवुन त्यांच्या
आयुष्यात लावु शकतो आपण आशादीप…
*आशा दीप दीप:कार…*
अगतिकतेने / हतबलतेने परतीचा मार्ग बंद झालेल्यांच्या आयुष्यात लावु शकतो आपण नवा पथप्रदर्शक दीप…
कितीतरी वाटा अंधारलेल्या…किती तरी मार्ग खुंटलेले…विषमतेच्या दरीत लोटलेले…दिशाहीन भरकटलेले… उपाशीपोटी दिवस कंठलेले…कितीतरी… कित्तीतरी…अनाथ…अपंग…असहाय्य…अंधारमय आयुष्याचे धनी…फार दूर नको जायला…आपल्याच अवतीभवती सापडतील कदाचित…हवी फक्त डोळस दृष्टी…
*लावु हातास आपले हात*
*’मम’ म्हणुन देऊ साथ*
*घर-अंगण सर्वांचे उजळी*
*मग रोजच हो दिवाळी*
*मदतीचे लावु तोरण*
*सौख्याचे होऊ कारण*
*इच्छा-कृतीचा मेळ-ज्योत*
*स्व-पर प्रकाशाचा तलम पोत*
हा सण साजरा करण्यास का सुरुवात झाली याबद्दल निरनिराळ्या मान्यता असलेला असा हा सण…दीपावली
जैनधर्मीयांचे चोविसावे तीर्थंकर…भगवान महावीर…त्यांचं निर्वाण झालं या दिवशी…
म्हणून जैनधर्मीय साजरा करणारा हा सण…दीपावली
खडतर मोक्षपथावर प्रकाश दाखवणाऱ्या
*धर्म दिव्या दीप:कार…*
आणि शेवटी…
*गर्भातच विझवण्याआधी*
*तिज उजेड पाहु द्या जगती*
*ती उजळेल जीवन आपले*
*कारण…*
*ती स्वतःच आहे पणती*
*कन्या दीप दीप:कार…*
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334