माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांना कार्यकारी अभियंता शेवाळे यांचे आश्वासन
कणकवली
नाटळ येथील मल्हार पूल पावसाळ्यामध्ये अचानक कोसळल्यामुळे लोकांच्या वाहतूकीचा मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता. आता पावसाळा संपत आला असतानाच नदीपात्राचे पाणी ही कमी झाले आहे. मात्र या मार्गावर अद्याप एसटी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रात सिमेंट पाईप टाकून एसटी व अवजड वाहतुकीसाठी रस्ता करण्यात यावा व वाहतूक सुरू करावी.
अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्याकडे भेट घेत केली. त्यावर शेवाळे यांनी येत्या दोन दिवसात मल्हार नदीवर नवीन पुलाचे काम होई पर्यत तात्पुरत्या स्वरूपात एस टी वाहतुकीसाठी रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण करून एस टी वाहतूक सुरू करण्यासाठी रस्ता तयार करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.
या मार्गावरील सध्या अवजड वाहनांची तसेच एस.टी ची वाहतूक होत नसल्यामुळे व्यापारी, गोरगरीब जनता तसेच विद्यार्थ्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नाहक आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहेत. त्यामुळे याबाबत नदीपात्रात पाईप टाकून त्यावर पक्का भराव करून हे काम तातडीने मार्गी लावा. अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा सावंत यांनी दिला आहे. यावेळी माजी सरपंच विजय भोगटे, संदीप सावंत उपस्थित होते