आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचे आयोजन
आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचा नवरात्रीनिमित्त आयोजित नवदूर्गा उत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. 23 ऑक्टोबरला संपन्न झाला. कॉसमॉस हवाईयन, ओवळा, घोडबंदर रोड,ठाणे येथे मा.भारती मेहता यांच्या फार्म हाऊस वर हा सोहळा पार पडला. या स्पर्धेत गोवा,मराठवाडा,
प.महाराष्ट्र,विदर्भ,खानदेश,ठाणे,कोकण,मुंबई या आठ विभागांनी सलग सहा दिवस सकाळी 10.00 ते 6.00 या वेळेत विविध सादरीकरण करून विविध गुणदर्शन घडविले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेष्ठ लेखिका मा. माधवी घारपुरे,वृत्तनिवेदिका मा.वासंती वर्तक,ज्तेष्ठ लेखिका डॉ.अनुराधा कुलकर्णी,प्रा.विजया पंडितराव,सचिव वृषाली राजे आणि वर्षा जोशी यांनी काम पाहिले. पहिला पुरस्कार आणि मानाची ट्रॉफी गोवा विभागाला देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी परीक्षक माधवी घारपुरे म्हणाल्या की “गोवा विभाग ही तीळ तीळ एकत्र करून बनलेली तिलोत्तमा आहे.ज्यात लेखन,कथन,मुलाखती,स्फूर्तिगीते,नाट्य,नृत्य,अनिमेशन,चारोळी,कविसंमेलन,परिसंवाद अश्या माध्यमातून विविध सादरीकरण करण्यात आले.” गोवा विभागाच्या प्रमुख प्रिया कालिका बापट यांनी हा पुरस्कार स्विकारला. दुसरे पारितोषिक आणि ट्रॉफी प.महाराष्ट्र आणि मराठवाडा विभाग याना विभागून देण्यात आली. अनुक्रमे प.महाराष्ट्र कडून शुभांगी दळवी, पुणे विभाग प्रमुख ज्योत्स्ना चांदुगडे, सातारा प्रमुख ऍड.सीमंतिनी नूलकर,मंजिरी कुलकर्णी यांनी तर मराठवाडा कडून औरंगाबाद विभाग प्रमुख माधुरी चौधरी यांनी स्वीकारले.
ह्या कार्यक्रमा मागची भुमिका आम्ही सिद्ध लेखिकाच्या अध्यक्ष प्रा.पद्मा हुशिंग यांनी स्पष्ट केली.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दुग्धशर्करा योग साधत आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची प्रत्यक्ष पहिली कार्यकारिणी सभा आयोजित केली होती. ह्या सभेत संस्थेच्या झालेल्या आणि होणा-या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील वर्षभरातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सभेला एका सूत्रात बांधण्याचे काम निवेदिका अस्मिता चौधरी यांनी केले तर खजिनदार संगीता चव्हाण यांनी आर्थिक व्यवहार स्पष्ट केला. सचिव वृषाली राजे आणि सहसचिव मानसी जोशी यांनी कामकाजाचे अहवाल वाचन केले.अध्यक्षा प्रा.पद्मा हुशिंग यांनी प्रास्ताविक करताना आम्ही सिद्ध लेखिका चा महामेरू अधिक वेगाने पुढे नेण्याविषयी सांगितले तर उपाध्यक्ष मा.विजया मारोतकर यांनी लेखिकांचे मनोबल वाढवत नवनवीन उपक्रम घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
निसर्गाच्या सानिध्यात अंताक्षरी,कविसंमेलन ,ज्येष्ठांचे मार्गदर्शन अश्या विविध मनोरंजनपर कार्यक्रमाद्वारे कोजागिरी पौर्णिमा देखील साजरी करण्यात आली.
लेखिकांनी आपल्या स्वलिखित पुस्तकांची देवाणघेवाण केली.
ह्या प्रसंगी आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या विश्वस्त-सल्लागार,भारती मेहता, डॉ अनुराधा कुलकर्णी,मा.आशा कुलकर्णी, मा.मेधा सोमण, मा.वासंती वर्तक, मा. माधवी घारपुरे, जेष्ठ लेखिका दीपा पटवर्धन, ठाणे जिल्हा कमिटीचे सदस्य हजर होए. तसेच विदर्भ विभाग प्रमुख, संस्थेच्या उपाध्यक्ष प्रा.विजया मारोतकर, खानदेश विभाग प्रमुख प्रा..संध्या महाजन, ज्योती राणे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख शुभांगी दळवी, कायदेशीर सल्लागार ऍड.सीमंतिनी नूलकर, पदाधिकारी मंजिरी कुलकर्णी, सल्लागार नीताताई बोबडे, पुण्याहून कार्याध्यक्ष ज्योत्स्ना चांदुगडे, मराठवाडा विभाग प्रमुख माधुरी चौधरी या सदस्य हजर होत्या.
सहसचिव मानसी जोशी यांनी आभार मानले.