उद्योगपती गौतम अदानी यांच्या गुजरात येथील मुद्रा पोर्ट येथे काही दिवसात ९,००० कोटी किमतीची ३,०००/- हजार किलो हेरॉईन डी. आर. आय. व कस्टम विभागाने जप्त केली आहे. हे अमली पदार्थ अफगाणिस्तान व इराण यांसारख्या आतंकवादी देशांतून गुजरात येथे आणण्यात आले असे सांगितले जात आहे. अशा प्रकारे अदानी पोर्ट वरून अनेक बेकायदेशीर तस्करी होत असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. असाच प्रकार मुंबई तसेच महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गौतम अदानी यांच्या महाराष्ट्रातील सर्व कंपन्या, कार्यालये, विमानतळे या ठिकाणी छापेमारी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा सृष्टी परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रतन कदम यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गौतम अदानी हे भारताचे आघाडीचे उद्योगपती आहेत. गुजरात मुद्रा पोर्ट येथे घडलेल्या प्रकरणामुळे असे दिसून येते की अदानी आपल्या पैशाचा व ताकदीचा वापर अमली पदार्थ, तस्करी व अनेक गैरव्यवहारासाठी वापरत आहेत. तसेच अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे संबंध असल्याकारणाने अद्याप गुजरात गुन्हे शाखेने गौतम अदानी यांच्यावर कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील जनतेला सुखरुप ठेवण्यासाठी उद्योजक गौतम अदानी यांच्या मुंबई व महाराष्ट्रातील कंपन्या, कार्यालये, पोर्ट, विमानतळे यांच्यावर जलद गतीने छापेमारी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रतनभाऊ कदम यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.