मालवण
आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या विशेष समिती सदस्यपदी नगरसेवक यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रुग्णकल्याण समिती सचिव डॉ. बालाजी पाटील यांनी सोमवारी दिली.
रुग्णालयात अधिक सेवा सुविधा उपलब्द करणे, समस्यांचे निराकरण करणे, नवीन उपाययोजना सुचवणे यासह रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने ही समिती कार्यरत असते. समितीच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक, सहअध्यक्षपदी तहसीलदार मालवण तसेच सचिवपदी वैद्यकीय अधीक्षक मालवण हे पदसिद्ध असतात. यांसह शासकीय सदस्य म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी मालवण, महिला व बालविकास अधिकारी मालवण, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम मालवण, उपअभियंता विद्युत विभाग कुडाळ, मुख्याधिकारी नगरपरिषद मालवण, डॉ. अविनाश झांटये खाजगी वैद्यकीय अधिकारी मालवण यासह प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नगरसेवक यतीन खोत यांची विशेष नियुक्ती या प्रमुख समितीत करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या तसेच गोरगरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यासाठी अविरत सेवाकार्य बजावणाऱ्या नगरसेवक यतीन खोत यांची शासकीय रुग्ण कल्याण समितीत नियुक्ती झाल्याने त्यांच्या सेवकार्यास अधिक बळ मिळणार आहे. २०२१-२२ या वित्तीय वर्षातील रुग्ण कल्याण नियामक समितीची पहिली सभा मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक तथा रुग्णकल्याण समिती सचिव डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.