सावंतवाडी
येणाऱ्या काळात शहरातून जाणाऱ्या रिंगरोड व पाण्यासाठी मोठा निधी आपण सावंतवाडी शहरासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहीती आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आपण सावंतवाडी पालिकेला दिलेल्या निधीतून विरोधकांनी उद्घाटने केले आहेत. मात्र मी कधीही त्याचे श्रेय घेतले नाही, असाही टोला त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव न घेता लगावला. श्री. केसरकर यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, आपण अर्थ राज्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला या दोन नगरपालिकासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्या निधीतून झालेली कामे आपण केली असे सांगून सत्ताधाऱ्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र ती कामे कोणी केली, हे सर्वांना माहीत आहे. कोणाला तरी आधी संधी दिली पाहीजे, कुणी काही करत आहेत त्यांना काय ते करू दे आपण त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करीत नाही. केल्यास काम करू दिले जात नाही, अशी ओरड होते. म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. परंतु माझा सावंतवाडी मतदार संघाकडे कायम लक्ष आहे. येत्या काळात सावंतवाडी शहरातून जाणारा रिंगरोड आणि पाण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच या ठिकाणी गटार व्यवस्था योग्य करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. असे केसरकर म्हणाले. पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठी नदीत असलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दोडामार्ग मधील एका नदीचा गाळ काढण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील अन्य नद्यांचे काम हातात घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी आपण पालकमंत्री असताना उपलब्ध करून दिली, असाही दावा श्री. केसरकर यांनी केला आहे.